Assembly Election 2024 – बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास कारवाई, उद्धव ठाकरे यांचा इशारा
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतील ज्या उमदेवारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी जर आज उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच शेकापच्या जंयत पाटील यांच्याशीही चर्चा झाली असून ठरलेल्या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर एका संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही काल परवापासून आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना सूचना देत आहोत. अनेकांनी अर्ज मागे घेतलेही आहेत. काहीजण अर्ज मागे घ्यायला चालले आहेत. उमेदवारी अर्ज कुणी मागे घेतले आणि कुणी नाही घेतले हे तीन वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ज्या उमेदवारांना आदेश देऊनही उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर नाईलाजाने पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल असा इशाराही उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्रितच ही निवडणूक लढवत आहोत. ज्या ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहेत, त्यांना आम्ही सूचना केल्या आहेत. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
शेकापसोबत चर्चा
शेतकरी कामगार पक्षासोबत आमची बैठक झालेली आहे. जयंत पाटील यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. माझ्याशीही त्यांची फोनवर चर्चा झाली अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. आम्ही उरणची जागा लढवणार आहोत आणि अलिबाग, पेण आणि पनवेल इथे शेकापचा उमेदवार निवडणूक लढवेल असा निर्णय आम्ही घेतला आहे. या मतदारसंघात दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सूचना गेल्या आहेत. त्याप्रमाणे शेकापचा उरणमधला उमेदवार आपला अर्ज मागे घेईल आणि आमचे उमेदवार अलिबाग, पेण आणि पनवेल मधील उमेदवारी अर्ज मागे घेतील. तीन वाजेपर्यंत सर्वांनी संयम ठेवूया. तीन वाजल्यानंतर जे काही चित्र असेल ते जगासमोर येईल असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, जे प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादीने केले आहेत, तेच प्रयत्न काँग्रेसनेही केले आहेत. मैत्रीपूर्ण लढतीच्या मार्गावर आमची जायची बिल्कूल इच्छा नाही असेही शरद पवार म्हणाले.
राज्याच्या थोबाडीत देणारा निर्णय
रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने हटवले आहे, हा निर्णय अतिशय योग्य आहे असे शरद पवार म्हणाले. माझ्या मते ही राज्य सरकारला थोबाडीत दिली आहे. या व्यक्तीचा कारभार संशयास्पद आहे. आणि त्याच्याबद्दल जाहीरपणाने अनेकवेळा लोक बोलतात. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला आहे. पवार ऑन जरांगे पाटील आणि महाविकास आघाडीचा काहीच संबंध नाही. निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांचा होता आणि माघार घेण्याचाही निर्णय त्यांचा होता. त्यांनी हा निर्णय योग्य आहे असेही शरद पवार म्हणाले.
तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल
आमची भूमिका कुणीही एकमेकांविरुद्ध न लढता, एकत्रितपणे काम करण्याची आहे असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी अशा अनेक उमेदवारांशी संपर्क साधून अर्ज मागे घेण्यास सांगितले. तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मित्रपक्षांना त्यांच्या जागा दिल्या आहेत. तरीही शेकाप, सपा, कम्युनिस्ट पक्षांनी काही ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यातील कॉम्रेड कराड आले होते. त्यांनी नाशिक पश्चिम येथून अर्ज भरला होता. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी चर्चा केल्यावर ते अर्ज मागे घेत आहेत असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List