महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणारच! महाडच्या क्रांतीभूमीतून आदित्य ठाकरे यांचा वज्रनिर्धार
उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारांनी आपले सरकार पाडले. महाराष्ट्राच्या डोक्यावर अवकाळी बसलेल्या मिंध्यांनी राज्यातील लाखो तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला पाठवले. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, टाटांचा एअर बस प्रकल्प, मेडिकल डिव्हाईस पार्क अशी किती यादी सांगायची. आपल्या तरुण-तरुणींच्या तोंडचा घास हिरावून त्यांना बेरोजगार करणाऱ्या खेके सरकारला सत्तेतून घालवून महाराष्ट्रात परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणारच, असा वज्र निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाडच्या क्रांतिभूमीतून केला. महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांसाठी रोजगारनिर्मिती हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी आज प्रचंड गर्दीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची भव्य सभा महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाली. या वेळी चौकाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. हाच धागा पकडून आदित्य ठाकरे म्हणाले, मागे याच चौकात सभा झाली तेव्हा तुफान पाऊस पडत होता, प्रचंड चिखल झाला होता. परंतु गर्दीतून एकही जण तसूभरही हलला नाही. तेव्हा मी नतमस्तक झालो होतो. आता हाच आशीर्वाद घेऊन आपल्याला विजय मिळवायचा आहे.
या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, महाविकास आघाडीचे दापोली विधानसभेचे उमेदवार संजय कदम, हनुमंत जगताप, दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा राऊळ, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, संपर्कप्रमुख अमित मोरे, महिला आघाडी जिल्हा संघटक स्विटी गिरासे, तालुकाप्रमुख आशीष फळसकर, पोलादपूर तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी यांच्यासह असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी कार्यकर्त्या व युवा सैनिक उपस्थित होते.
भाजप महाराष्ट्रद्वेषाचा सण गुजरातेत साजरा करतोय
आज इथे सभा सुरू असताना तिथे गुजरातेत महाराष्ट्राच्या मिहानमधून पळवलेल्या टाटा एअरबस प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू आहे. तिथे पंतप्रधानांपासून सगळे उपस्थित आहेत. भाजप गुजरातमध्ये महाराष्ट्रद्वेषाचा सण साजरा करतोय. तुम्ही सांगा हे असले सरकार तुम्ही डोक्यावर पुन्हा बसवणार का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला तेव्हा गर्दीतून नाही… नाही… असा आवाज घुमला.
रोजगार, रोजगार आणि फक्त रोजगार
आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात साडेसहा लाख कोटींची आलेली गुंतवणूक, वेदांता फॉक्सकॉनचा पावणेदोन लाख कोटींचा प्रकल्प, मिहानमधील टाटा स्कायबसचा प्रकल्प, रायगड जिह्यातील 75 हजार नोकऱ्या देणारा बल्क ड्रग्ज प्रकल्प याची यादीच वाचून दाखवत खोके सरकारने हे प्रकल्प उचलून गुजरातला पाठवले आणि इथल्या लाखो तरुणांना बेरोजगार केले, असा घणाघात केला. आमचा पहिला अजेंडा या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा असेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याचे स्वप्न घेऊन आपण पुढे चाललो आहोत. सत्ता आल्यावर माझ्यासमोर तीन उद्दिष्टय़े आहेत ती म्हणजे रोजगार, रोजगार आणि फक्त रोजगार. त्याची सुरुवात महाडमधून करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यालाच ठोकला पाहिजे!
आताच्या उद्योग मंत्र्यांचा धंदा काय, असे आदित्य ठाकरे यांनी विचारताच गर्दीतून डांबर… डांबर… असा आवाज घुमला. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांचा धंदा डांबराचा असला तरी रस्त्यावरून डांबर गायब झाले, राज्यातून उद्योग गायब झाले, असा उद्योग मंत्री डोक्यावर आणून बसवला आहे. त्यांना विचारा गेल्या दोन वर्षांत डांबर सोडून दुसरा उद्योग त्यांनी केला आहे काय? या उद्योग मंत्र्यांची काय ही प्रतिमा! पूर्वी गावात मंत्री आला की, त्यांचा रुबाब पाहून लोक त्यांना सलाम ठोकायचे. आता असं वाटतं की यांनाच ठोकून काढलं पाहिजे.
गुजरातविरुद्ध देश
गुजरातशी आमचा वाद नाही, गुजराती लोकांशीही आमचा वाद नाही. केवळ महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा वाद नाही तर गुजरात विरुद्ध झारखंड, गुजरात विरुद्ध उत्तर प्रदेश असेही वाद सुरू झालेत. झारखंडमधील उद्योगही भाजपने उचलून गुजरातला नेले. उत्तर प्रदेशात बनारसमधले तरुण म्हणतात, इथल्या कामांचे सगळे कॉण्ट्रक्ट गुजराती लोकांना मिळत आहेत. आता इथल्या देवळांमध्ये पुजारीही गुजरातमधून येणार आहेत. गुजरातविरुद्ध देश असे चित्र भाजपने या देशात निर्माण केले आहे, असा संतापही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांचे महाडकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज ठिकठिकाणी लावले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List