शिक्रापुरात स्टेट बँक ऑफ इंडिया आगीच्या भस्मस्थानी
शिक्रापूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये बँक पूर्णपणे जाळून खाक झाली. दोन अग्निशमक बंबांच्या साहाय्याने आग विझवण्यात यश आले असून, दुर्घटना टळली आहे.
शिक्रापूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोरून महिला पोलीस हवालदार किरण निकम या पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांना बँकेच्या आतमधून धुराचे लोळ येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनसह अग्निशमन दलाला माहिती दिली, दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, किरण निकम, ललित चक्रनारायण, बँकेचे व्यवस्थापक अमोल नफाडे, ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ, त्रिनयन कळमकर, दीपक भुजबळ, नाना गिलबिले, ओंकार हिरवे, सोमनाथ भुजबळ यांसह नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
काही वेळाने पुणे महानगर विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील दोन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतचे उपअग्निशमन अधिकारी महेंद्र माळी, अशोक हातवटे, अमोल गायकवाड, सचिन शेंडगे, पुणे महानगर प्राधिकरणचे अल्ताब पटेल, लक्ष्मण मिसाळ, प्रशांत अडसूळ, महेश पाटील, संकेत कुंभार, कृष्णा नांगरे यांसह आदींनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. मात्र, आगीमध्ये बँकेचे सर्व साहित्य, कागदपत्रे, कॉम्प्युटर, फर्निचर जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पण बँकेचे मुख्य लॉकर सुरक्षित राहिले असल्याचे दिसून आले, मात्र यावेळी लागलेली आग नेमकी कशाने लागली, याबाबत काही समजू शकले नाही, तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी व मनुष्यवस्तीमध्ये असलेल्या बँकेला लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List