Maharashtra election 2024 – बारामतीतून युगेंद्र पवार, अजित पवार यांचे अर्ज
बारामती विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
युगेंद्र यांचे कन्हेरी येथील निवासस्थानी मातोश्री शर्मिला यांच्याकडून औक्षण करण्यात आले. ग्रामदैवत कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत त्यांनी शहरातील कसबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते प्रशासकीय भवनात दाखल झाले. तेथे शरद पवार यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस.एन. जगताप, सदाशिव सातव, सतीश खोमणे यांच्या उपस्थितीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज दाखल केला.
आजोबा पाठीशी – युगेंद्र
मी गेली काही वर्षे समाजकारणात सक्रीय होतो. पक्षाने उमेदवारी देत मोठी जबाबदारी दिली, त्याचा आनंद आहे. मी राजकारणात नवखा असलो तरी 50 वर्षांहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे आजोबा शरद पवार माझ्यासोबत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. बारामतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भ्रष्टाचार बोकाळला आहे. गुन्हेगारी वाढली आहे. अशा अनेक प्रश्नांसाठी आपला लढा असेल, असे युगेंद्र पवार म्हणाले.
पवार-पवार आमनेसामने
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे हे कसब्यात दाखल झाले. येथूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रॅली निघणार होती. त्यामुळे अजित पवार गटाचे पदाधिकारी-कार्यकर्ते ढोल-ताशांसह येथे आले होते. युगेंद्र व सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ते जाईपर्यंत अजित पवार हे मोटारीत थांबून राहिले. तदनंतर अजित पवार यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List