तिथे दहशवादी हल्ला अन् इथे अभिनेत्याकडून व्लॉगचं प्रमोशन..; ट्रोलिंगनंतर अखेर दिलं स्पष्टीकरण
‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम यांना पहलगाम हल्ल्यानंतर पोस्ट केलेल्या नव्या व्लॉगमुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले होते. ज्यादिवशी हा हल्ला झाला, त्याचदिवशी दीपिका आणि शोएब श्रीनगरहून दिल्लीला परतत होते. यावेळी त्यांनी युट्यूबवर त्यांचा व्लॉग पोस्ट केला होता. ज्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना असंवेदनशील असल्याची टीका केली होती. आता एक नवीन व्लॉग पोस्ट करत शोएबने त्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे.
“आम्ही 22 एप्रिल रोजी श्रीनगरहून दिल्ली परतलो. आम्ही विमानात असताना पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. कारण विमानात आम्हाला नेटवर्क किंवा कनेक्शनच नव्हतं. जेव्हा आम्ही विमानातून उतरलो आणि आमचे फोन स्विच ऑन केले, तेव्हा आम्हाला धडाधड लोकांचे आणि कुटुंबीयांचे मेसेज येत होते. सुरुवातीला फक्त पर्यटकांच्या जखमी झाल्याची माहिती होती. आम्ही सुरक्षित आहोत याची माहिती आमच्या शुभचिंतकांना द्यावी असा आम्ही विचार केला. त्याचा उल्लेख मी व्लॉगमध्ये केला होता. पण तो व्लॉग प्रमोट करायचा माझा कोणताही हेतू नव्हता”, असं स्पष्टीकरण शोएबने दिलं आहे.
याविषयी तो पुढे म्हणाला, “आम्ही ठीक आहोत आणि अपडेट देत राहू अशी स्टोरी मी माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली होती. त्यावरून काही लोकांनी, मीडिया पोर्टल्सने आणि काही युट्यूब चॅनल्सने मोठा वाद निर्माण केला. माझ्या व्लॉगचं प्रमोशन करण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. फक्त त्यावेळी माझ्याकडे घटनेविषयीची संपूर्ण माहिती नव्हती. हळूहळू सोशल मीडियावर व्हिडीओ येत होते, तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं. पण फक्त मलाच का लक्ष्य केलं गेलं? दीपिकाला का टारगेट केलं? आम्ही तुमच्यासाठी खास आहोत का? प्रत्येक व्लॉगरने व्हिडीओ पोस्ट केले आहेत.”
पहलगाममध्ये इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला असताना शोएब आणि दीपिका त्यांचे फिरण्याचे व्लॉग पोस्ट करत आहेत, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती. परंतु घटनेचं गांभीर्य माहीत नसताना अनवधानाने पोस्ट केल्याचं स्पष्टीकरण आता शोएबने दिलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List