‘नेहरूंकडून आंबेडकरांचा अपमान, तर मोदींकडून देवतुल्य स्थान’; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी कंगना यांचं मोठं वक्तव्य
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. राजकारणात प्रवेश केल्यानंतर कंगना यांनी अनेकदा विविध मुद्द्यांवरून काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “या पक्षाने लोकांना मूर्ख बनवण्याशिवाय आणि दुर्लक्ष करण्याशिवाय काहीही केलेलं नाही. आजकाल हा पक्ष भीमराव आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत हातात धरून व्होट बँकचं राजकारण करत आहे”, असं त्या म्हणाल्या. हिमाचल प्रदेशमधील मंडी इथल्या खासदार कंगना यांनी देशाची माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. “माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान निर्मात्यांचा अपमान केला होता आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं होतं”, असा आरोप त्यांनी केला.
“आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेचा नेहरू यांना हेवा वाटत होता. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबेडकरांना केवळ भारतरत्नच दिलं नाही तर त्यांचे ‘पंच तीर्थ’ पूजनीय असल्याचं घोषित करून त्यांना देवासारखं स्थान दिलं”, असं कंगना यावेळी म्हणाल्या. त्यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या नेतृत्त्वाखालील हिमालच सरकारवरही हल्लाबोल केला. “या सरकारच्या दुर्दशेमुळे आज जनता पूर्णपणे त्रस्त आहे. अपंग आणि विधवांना सामाजिक सुरक्षा पेन्शनही मिळत नाहीये”, असा दावा कंगना यांनी केला.
“सुखविंदर सिंह सुखू यांच्या सरकारने त्यांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी घेऊन अनेक गरीब लोक माझ्याकडे येत आहेत. राज्य सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांना त्यांचे फोन उचलायला आवडत नाही. हा पक्ष आज संपूर्ण देशात बदनाम झाला आहे,” अशी जोरदार टीका त्यांनी केली.
कंगना यांनी कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्यावरही निशाणा साधला आहे. “जेव्हा निवडणूक निकाल भाजपच्या बाजूने आले तेव्हा त्यांचा नेता आपला चेहरा दाखवू शकला नाही. मंडीच्या कन्येची बदनामी करण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागली आणि इथल्या महिला शक्तीने त्यांना चोख उत्तर दिलं”, असं त्या म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List