पिंपरी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत; दोन महिन्यांत 1800 तक्रारी
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली असून, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, दोन महिन्यांमध्ये शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत तब्बल एक हजार 810 तक्रारी आल्या आहेत.
शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. अनियमित, अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची ओरड सुरू आहे. उन्हाळ्यामुळे शहरातील बोअरवेलचे पाणी आटले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी टैंकर्सद्वारे तहान भागवावी लागत आहे. सोसायट्यांना टँकरचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शहरासह देहू रोड, तळेगाव दाभाडे, मावळ, तसेच पिंपरी-चिंचवड एमआयडीसी, ग्रामपंचायतीच्या पाणी योजना, शेतीसाठी पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या उन्हाळा तीव्र असल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. दुसरीकडे धरणातून काही प्रमाणात पाणीगळतीही होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात सोमवारी ३५.८० टक्के पाणीसाठा होता. गतवर्षी २८ एप्रिलपर्यंत धरणात ३४.९६ टक्के पाणीसाठा होता. म्हणजे या वर्षी ०.८४ इतका अधिकचा पाणीसाठा आहे. उन्हाळा संपण्यास आणखी सव्वा ते दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे. तोपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
पाण्याची नासाडी टाळावी. महापालिकेने पुरवठा केलेल्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर करू नये. गळती थांबवावी. नादुरुस्त नळ व टाक्या दुरुस्त करून घ्यावेत. वाहने धुणे, अंगण, रस्ते, पार्किंगवर पाणी मारू नये. झाडांना पिण्याचे पाणी घालू नये. त्यासाठी बोअरिंगच्या पाण्याचा किंवा प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दुसरीकडे आंद्रा धरणातून महापालिका दररोज 80 ते 90 एमएलडी पाणी घेत आहे. हे पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यावरून उचलले जात आहे. तेथून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्या भागात पुरविले जाते. या धरणाचा पाणीसाठा 40 टक्के इतका आहे. तर, भामा आसखेड धरणातून महापालिकेने अद्यापि पाणी उचलण्यास सुरुवात केली नसून, जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.
1 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत ‘सारथी’ हेल्पलाइनवर अपुऱ्या व कमी दाबाने पाणीपुरवठ्याच्या तब्बल एक हजार 810 तक्रारी आल्या आहेत. त्यांपैकी एक हजार 143 तक्रारी निकाली काढल्या असून, 667 तक्रारी प्रलंबित आहेत. सर्वाधिक 390 तक्रारी ‘ब’ प्रभागातून, तर सर्वांत कमी 89 तक्रारी ‘अ’ प्रभागातून आल्या आहेत.
पाण्याचा अपव्यय टाळा
पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. शहरासाठी या धरणातून दररोज ५१० एमएलडी पाणी वापरले जाते. धरणातील सध्याचा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला जूनअखेरपर्यंत पुरेल इतका आहे. मात्र, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, पाण्याचा अपव्यय करू नये, पिण्याचे पाणी पिण्यासाठीच वापरावे, वाहने धुणे, तसेच अंगण, रस्ते पार्किंग, झाडांना मारण्यासाठी त्याचा वापर करू नये. महापालिकेच्या नळास थेट विद्युत पंप लावून पाणी खेचण्यावर कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत २५०पेक्षा अधिक पंप जप्त करण्यात आले आहेत.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग
बाष्पीभवन वाढले
या वर्षी उन्हाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढून धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. धरणात सद्यः स्थितीत ३५.८० टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल. मात्र, नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
– रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List