उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी नागरिकांची लूट
उच्च सुरक्षा वाहन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने दर निश्चित केले आहेत. पण, प्रत्यक्षात अर्ज भरणे ते नंबर प्लेट बसविण्यापर्यंत वाहनचालकांची खुलेआम लूट सुरू आहे. फिटमेंट सेंटरवरही पैसे मागितले जात आहेत. याबाबत तक्रारी करूनही प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षा वाहन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले. याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ मध्ये दिले. तसेच, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला. राज्यात परिवहन विभागाने एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना नव्या पद्धतीच्या नंबर प्लेट लावून घेणे डिसेंबर २०२४ पासून बंधनकारक केले आहे. यासाठी तीन खासगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत राज्यातील ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ‘एचएसआरपी’ उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यात परिवहन विभागाने दुचाकीसाठी जीएसटीसह ५३१ रुपये आणि चारचाकीसाठी ८७९ रुपये असे दर निश्चित केले आहेत.
ग्रामीण भागात काही वाहनचालकांना अर्ज भरता येत नसल्यामुळे ते महा-ई-सेवा केंद्र किंवा सायबर कॅफेत गेले असता, त्यांच्याकडून एक अर्ज भरण्यासाठी १०० ते २०० रुपये घेतले जात आहेत. तसेच, फिटमेंट सेंटरवर जुनी नंबर प्लेट काढून नवीन बसविण्याचे सुमारे २०० ते २५० रुपये घेतले जात आहेत. नंबर प्लेटच्या प्लॅस्टिक फ्रेमचे दर निश्चित नसल्यामुळे फिटमेंट सेंटरवर मनमानी पद्धतीने पैसे आकारले जात आहेत. तेथे परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याचे वाहनचालक सांगत आहेत.
असे आहेत दर
> महा-ई-सेवा केंद्रात अर्ज करण्यासाठी १०० ते २०० रुपये.
> नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी १०० ते २०० रुपये.
> फिटमेंट सेंटरवर जुनी नंबर प्लेट काढणे ५० रुपये.
> नंबर प्लेट बॅकेट शुल्क दुचाकी २०० ते ३००, तर चारचाकीसाठी ३५० ते ४०० रुपये आकारले जात आहेत.
“जुनी नंबर प्लेट काढण्यासाठी सरसकट १०० रुपये घेत आहेत. फिटमेंट सेंटरचालक नागरिकांची लूट करत आहेत. आरटीओने अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी.
– नारायण पाटील, वाहनचालक.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List