‘त्यांच्या घरात आई-बहीण..’; घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए. आर. रेहमान यांचं उत्तर
जगप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या जवळपास तीन दशकांनंतर पत्नी सायरा बानूला घटस्फोट देत असल्याचं जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला होता. या घटस्फोटावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. आता जवळपास सहा महिन्यांनंतर रहमान यांनी त्यांच्या संपूर्ण परिस्थितीवर मौन सोडलं आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांना घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. नयनदीप रक्षितच्या युट्यूब चॅनलवर ए. आर. रहमान म्हणाले, “सार्वजनिक आयुष्य जगण्याचा निर्णय जाणूनबुजून किंवा विचारपूर्वक घेतला जातो, जिथे प्रत्येकाची समीक्षा केली जाते. अगदी सर्वांत श्रीमंत व्यक्तीपासून देवापर्यंतही.. प्रत्येक व्यक्तीची आलोचना केली जाते. मग यातून वाचणारा मी कोण आहे? जोपर्यंत आम्ही एकत्र राहतोय, आम्ही गर्विष्ठ नाही किंवा एकमेकांशी विषारी वागत नाही, अगदी त्या लोकांमध्येही.. कारण ते सर्व कुटुंब आहेत.”
या मुलाखतीत ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला असता रहमान यांनी कर्मावर विश्वास असल्याचं सांगितलं. “कर्मा नावाची एक गोष्ट असते. जर मी एखाद्याच्या कुटुंबीयांबद्दल बोललो तर कोणीतरी माझ्याही कुटुंबाबद्दल बोलणार. आपण सर्व भारतीय यावर विश्वास ठेवतो. कोणती विनाकारण काही बोलणार नाही कारण प्रत्येकाला बहीण, पत्नी आणि आई आहे. जरी मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या कुटुंबीयांबद्दल काहीतरी बोलतंय, तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करतो की, कृपया त्यांना माफ कर आणि त्यांना योग्य मार्ग दाखव”, असं ते पुढे म्हणाले.
गेल्या वर्षी 20 नोव्हेंबर रोजी ए. आर. रहमान यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यानंतर सायरा बानू यांच्या वकील वंदना शाह यांनी एक निवेदन जारी केलं होतं. ‘लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सायरा यांनी पती ए. आर. रेहमान यांच्यापासून विभक्त होण्याचा अत्यंत अवघड निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यातील अत्यंत भावनिक ताणातून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. एकमेकांविषयी प्रेम असतानाही नात्यातील समस्या आणि ताण यांमुळे त्यांच्यात ही दरी निर्माण झाली आहे. ही दरी आता भरू शकत नाही, असं दोघांनाही वाटतंय’, असं वकिलांनी निवेदनात स्पष्ट केलं होतं.
मार्च महिन्यात जेव्हा रहमान यांना छातीत दुखण्याच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हा सायरा यांच्याकडून आणखी एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. त्यात त्यांनी रहमान यांची पूर्व पत्नी असा उल्लेख करू नका, अशी विनंती केली होती. “ए. आर. रेहमान हे व्यक्ती म्हणून हिऱ्यासारखे आहेत. या जगातील ते सर्वोत्कृष्ट पुरुष आहेत. माझ्या आरोग्याच्या समस्यांमुळे मला चेन्नई सोडावं लागलं. मी युट्यूबर्स आणि तमिळ मीडियाला विनंती करते की त्यांनी त्यांच्याविरोधात काहीही वाईट बोलू नये. माझ्या आयुष्यात मी त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला. इतकं माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे”, असंही सायरा यांनी घटस्फोटानंतर स्पष्ट केलं होतं. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांनी 12 मार्च 1995 रोजी चेन्नईत लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List