महेश भट्ट-पूजा भट्टच्या वादग्रस्त किसिंग फोटोबद्दल अखेर मुलाने सोडलं मौन; म्हणाला..
दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची मुलगी, अभिनेत्री पूजा भट्ट यांनी एका मॅगझिनसाठी खास फोटोशूट केलं होतं. त्या फोटोशूटवरून त्याकाळी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामागचं कारणही तसंच होतं. या फोटोमध्ये महेश भट्ट आणि पूजा एकमेकांना ओठांवर किस करताना दिसले होते. आता जवळपास तीन दशकांनंतर भट्ट कुटुंबातील एका सदस्याने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा सदस्य दुसरा-तिसरा कोणी नसून महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुलला त्याच्या वडिलांच्या या वादग्रस्त फोटोशूटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्यावेळी महेश आणि पूजा भट्ट यांचं फोटोशूट प्रदर्शित झालं होतं, त्यावेळी राहुल फक्त 14 वर्षांचा होता.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, “काही फरक पडत नाही. माझ्यासाठी ते एखाद्या पक्षाने पंखांवरून पाणी झटकल्यासारखं होतं. सत्य काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही हे लहानपणापासून पाहिलंय यार. फिल्मी कुटुंबातील मुलगा एकतर फारच त्रस्त असतो किंवा फार मजबूत असतो. लोकांना असं वाटतं की आम्हाला फरक पडतो, पण नाही. आम्हाला अशा वादाने काही फरक पडत नाही.”
खुद्द पूजा भट्टसुद्धा या वादावर एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली होती. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली, “तो क्षण अत्यंत निरागस होता. जर लोक एखाद्या वडील आणि मुलीच्या नात्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू शकतात, तर मग ते काहीही करू शकतात. आणि मग आपण कौटुंबिक मूल्यांबद्दल मोठमोठ्या बाता करतो. फारच कमालीचा विनोद आहे हा.”
पूजा भट्ट ही महेश भट्ट आणि त्यांची पहिली पत्नी किरण भट्ट यांची मुलगी आहे. तर आलिया आणि पूजा या सावत्र बहिणी आहेत. आलिया ही महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी आहे. आलिया ही महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांची मुलगी, अशीही अफवा होती. त्यावर पूजाने एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं होतं. “आपल्या देशात ही फार जुनी गोष्ट आहे. एखाद्याचं त्याच्या मुलीसोबत किंवा वहिनीसोबत किंवा बहिणीसोबत रिलेशनशिप असल्याची चर्चा करणं काही नवीन नाही. अशा चर्चांना तुम्ही कसं रोखू शकणार? त्यावर प्रतिक्रिया देऊन त्या गोष्टीला अधिक महत्त्व द्यावं का? हे मूर्खपणाचं आहे”, असं ती म्हणाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List