महायुतीत खळबळ… भांडय़ाला भांडं लागतंच! चंद्रकांत पाटील बिनधास्तपणे बोलून गेले…
राज्यात सत्ताधारी महायुतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा असतानाच आज भाजप नेते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील बिनधास्तपणे बोलून गेले. ‘एकाच रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात, तिथेही भांडय़ाला भांडं लागतंच! सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पाहावी लागतील की, ती जिवंत आहेत की गेली आहेत,’ असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार केली असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. आणि अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पाहावी लागतील. खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत. खळखळ व्यक्त करायची असते. जर ती व्यक्त केली नाही, तर माणसं आजारी पडतात.’
फडणवीस यांनी अर्थ सल्लागार नेमला; अजितदादांच्या खात्यावर ‘वॉच’
राज्यात महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा एकमेकांवर विश्वास आहे की नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे अजितदादांना प्रिय असलेल्या त्यांच्या अर्थ खात्यावर आता मुख्यमंत्र्यांचा ‘वॉच’ राहणार आहे. परदेशी यांची नेमणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुचली नसल्याचीदेखील चर्चा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List