‘तारक मेहता..’मधील कलाकारांच्या आरोपांवर अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन; म्हणाले “मी त्यांना माफ..”
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. लोकप्रियतेसोबत ‘तारक मेहता..’ ही मालिका काही वादांमुळेही चर्चेत राहिली. यातील काही कलाकारांनी निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मिसेस सोढीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने त्यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. तर तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांनी पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या सर्व आरोपांवर आता निर्मात्यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले, “मी कलाकारांपासून कधी दुरावलो नव्हतो. जर एखादी समस्या असेल तर ते नेहमीच मला संपर्क करू शकत होते. मी नेहमीच प्रामाणिकपणे वागलो आणि मालिकेला प्राधान्य दिलं. त्यातून मी कधीच वैयक्तिक फायद्याचा विचार केला नाही. त्यामुळे अशा आरोपांमुळे मी नाराज झालो होतो. परंतु हा आयुष्याचा एक भागच आहे.”
“मालिका सोडून गेल्यानंतर काही कलाकार माझ्याविषयी बरंवाईट बोलत आहेत. ठीक आहे. मी त्यांना काहीच बोलणार नाही. त्यांनी माझ्या मालिकेत काम केलंय आणि ‘तारक मेहता..’च्या यशात त्यांची भूमिका आहे. जरी मी मालिकेचा कर्ताधर्ता असलो तरी प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे ती लोकप्रिय झाली. आज ही मालिका ज्या यशाच्या शिखरावर आहे, ते फक्त माझ्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे नाही तर सर्वांमुळे आहे. आम्ही सर्वजण जणू एखाद्या ट्रेनसारखे आहोत. काही डब्बे रुळावरून घसरतात, परंतु तरीही ट्रेन चालत राहते. मलाही वाईट वाटतं पण मी त्यांना माफ करतो. कारण जर मी माझ्या मनात हेवेदावे घेऊन बसलो तर मी कधीच खुश राहू शकणार नाही आणि कधीच लोकांना हसवू शकणार नाही”, असं ते पुढे म्हणाले.
‘तारक मेहता..’च्या यशाबद्दल असित कुमार मोदी म्हणाले, “जेव्हा एखादी मालिका लोकप्रिय होते, तेव्हा ते संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळ असतं. त्या सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना कोणतीही समस्या होणार नाही याची काळजी मी घेईन. मी त्यांना एकत्रित ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करतो आणि जर ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक राहिले तर इतक्या समस्या निर्माण होणारच नाहीत.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List