तब्बल 5 वर्षांनंतर दयाबेन परतणार? निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बापूजी, जेठालाल, दयाबेन, बबिताजी, भिडे मास्तर, टप्पू, नट्टू काका.. या सर्व भूमिका घराघरात लोकप्रिय आहेत. गेल्या काही वर्षांत काही कलाकारांनी या मालिकेला रामराम केला असला तरी त्यांच्या जागी आलेल्या नव्या कलाकारांनाही प्रेक्षकांकडून तेवढंच प्रेम मिळालं. परंतु आजही चाहत्यांना एका कलाकाराची कमतरता आवर्जून भासते, ती म्हणजे दयाबेन. या मालिकेत जेठालालची पत्नी दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकारली होती. दिशाने 2017 मध्ये या मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती परतलीच नाही. निर्मात्यांनीही तिच्या जागी नव्या अभिनेत्रीची निवड केली नाही. या मालिकेच्या चाहत्यांकडून सतत दयाबेनच्या परतण्याविषयी प्रश्न विचारले जात आहेत. आता निर्माते असित कुमार मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत असित कुमार मोदी म्हणाले, “या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. काही लोक तक्रार करतात की दया भाभी शो सोडून गेल्यापासून त्यांना ही मालिका पाहण्यात मज्जा येत नाही, हे मला मान्य आहे. मी लवकरच दया भाभीला मालिकेत परत आणेन. दया भाभीची कमतरता भरून काढण्यासाठी संपूर्ण लेखकांची आणि कलाकारांची टीम खूप मेहनत घेत आहे. दया भाभी लवकरच मालिकेत परत येईल.”
अभिनेत्री दिशा वकानीबद्दल त्यांनी पुढे सांगितलं, “दिशाच मालिकेत परत येईल याविषयी आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो. तिच्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. ती माझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि आम्ही आजही एका कुटुंबासारखे आहोत. तिच्यासाठी कामावर परतणं कदाचित कठीण असेल. परंतु मी दयाबेनच्या भूमिकेसाठी काही जणांची निवड केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला लवकरच समजेल. दिशाने मालिका सोडून आता जवळपास पाच वर्षे झाली आहेत आणि आम्हाला तिची आजही खूप आठवण येते. सेटवरील इतर कलाकारांची आणि क्रू मेंबर्सची ती खूप काळजी घ्यायची. दिशा वकानीसारखीच कोणीतरी भेटावी हेच आमचं उद्दिष्ट आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List