वक्फ कायद्याविरोधात प्रसिद्ध अभिनेत्याचा पक्ष सुप्रीम कोर्टात
वक्फ संशोधन विधेयकामुळे सध्या देशात वातावरण तापलेलं असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि तामिळनाडूचा प्रादेशिक पक्ष तमिलगा वेट्ट्री कषगम (टीव्हीके) यांनीही वक्फ कायद्याला आव्हान दिलं आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन्ही पक्षांनी या कायद्याला अल्पसंख्याकांच्या हक्कांचे उल्लंघन आणि संविधानाच्या धर्मनिरपेक्ष भावनेविरुद्ध म्हटलं आहे. रविवारी, सीपीआयच्या वतीने पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांनी सर्वोच्च न्यायालयात लेखी याचिका दाखल केली.
याचिकेत डी राजा यांनी असा दावा केला आहे की, ही दुरुस्ती संविधानाच्या कलम 14 (समानतेचा अधिकार), कलम 25 (धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार) आणि कलम 26 (धार्मिक संस्थांना स्वातंत्र्य) यांचं उल्लंघन करते. याचिकेत असेही म्हटले आहे की, या कायद्यानुसार, वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आता राजकीय हस्तक्षेपाच्या अधीन असू शकते, ज्यामुळे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेवर परिणाम होईल.
त्याच दिवशी, तमिळ सिनेमा अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या पक्ष ‘तमिलगा वेट्ट्री कषगम’ (टीव्हीके) नेही सर्वोच्च न्यायालयात त्याच कायद्याला आव्हान देणारी एक वेगळी याचिका दाखल केली. टीव्हीके याचिकेत म्हटलं आहे की, विधेयकातील दुरुस्ती राज्यांच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करते आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हितांना हानी पोहोचवते. त्यांनी याला “राजकीयदृष्ट्या प्रेरित पाऊल” म्हटलं आहे.
या याचिकेवर आता सुप्रीम कोर्टात 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. वक्फ कायद्याशी संबंधित ही दुरुस्ती अनेक राज्यांमध्ये वाद आणि चिंतेचे कारण बनली आहे, त्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.
सांगायचं झालं तर, 3 एप्रिल रोजी वक्फ संशोधन विधेयकाला मान्यता देण्यात आली. लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं, या विधेयकावर मध्यरात्री उशिरा लोकसभेत मतदान पार पडलं. अखेर हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. विधेयकाच्या बाजुनं 288 इतकी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 232 इतकी मतं पडली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List