रिॲलिटी शोजबाबत शानचा धक्कादायक खुलासा; स्पर्धकांच्या गायनाबाबत पोलखोल
शान हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आहे. तो ‘द वॉईस ऑफ इंडिया’, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ यांसारख्या गायनाच्या रिअॅलिटी शोजमध्ये तो परीक्षक होता. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत त्याने अशाच काही रिॲलिटी शोजची पोलखोल केली आहे. कशापद्धतीने त्यातील स्पर्धकांचा परफॉर्मन्स सुधारला जातो आणि एडिट केलं जातं, याविषयीचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. वास्तव आणि सत्य यांना अशा शोजमध्ये कशा पद्धतीने बदललं जातं, हे समजल्यावर त्यापासून त्याने दूरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच शान सध्या कोणत्याच रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसून येत नाही.
विकी लालवानीच्या पॉडकास्टमध्ये शानने सांगितलं की 2018 नंतर रिॲलिटी शोजचं प्रॉडक्शन कशा पद्धतीने बदलत गेलं. फक्त सिंगिंग शोजबद्दल बोलताना शान म्हणाला की स्पर्धक स्टेजवर फक्त एकदाच लाइव्ह गाणं गातात. नंतर त्यांचं गाणं पूर्णपणे डब केलं जातं. “तिथे मंचावर स्पर्धक फक्त एकदाच गाणं गातात. नंतर तो ऑडिओ स्टुडिओमध्ये घेऊन पुन्हा त्यांना गायला सांगितलं जातं. हे गेल्या काही वर्षांपासून असंच सुरू आहे. स्टुडिओमध्ये ते गाणं आणखी चांगलं एडिट केलं जातं. जवळपास सर्वजण शेवटच्या परफॉर्मन्सपर्यंत पिच परफेक्ट असतात, जे खरंच शक्य नाही”, असा खुलासा शानने केला.
शानने यावेळी असाही दावा केला की रिॲलिटी शोजचे परीक्षक हे एपिसोडच्या शेवटच्या एडिटिंगला लक्षात ठेवून आपली प्रतिक्रिया देतात. ज्यावेळी शोजचं कंटेंट ‘खरं’ होतं, तेव्हा टीआरपी अधिक चांगली होती, असंही मत शानने मांडलं आहे. “जेव्हा या गोष्टी जाणूनबुजून बळजबरीने केल्या जात होत्या, तेव्हा मला त्यांची समस्या जाणवू लागली होती. म्हणूनच मी त्यापासून दूर राहायचं ठरवलं”, असं त्याने सांगितलं. शान गेल्या काही वर्षांत कोणत्याच रिॲलिटी शोजमध्ये झळकला नाही.
काही दिवसांपूर्वी ‘इंडियन आयडॉल 15’च्या सेटवरून एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या हातात शोची स्क्रिप्ट दिसली होती. या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. शोमध्ये पाहुणे जे काही म्हणतात, ते सर्व स्क्रीप्टेड असतं, असा अंदाज अनेकांनी यावरून लगावला होता. या फोटोवरून अनेकांनी रिअॅलिटी शोजमागील सत्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यावर अद्याप शोच्या निर्मात्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List