‘पाणपोई’ची जागा घेतली ‘वॉटर एटीएम ‘ने
उन्हाच्या कडाक्यामध्ये पायी प्रवास करून थकल्यानंतर रस्त्यांच्या कडलेल्या असलेल्या ‘पाणपोई’ मधील थंडगार पाणी हे वाटसरूंसाठी अमृतापेक्षा कमी नसायचे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘पाण्याचे दान हे सर्वश्रेष्ठ दान’ मानले गेले आहे. त्यामुळे पूर्वी शहरासह ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत सामाजिक संस्था-संघटना, गणेश मंडळांतर्फे चौकाचौकांत पाणपोईची व्यवस्था केली जायची. मात्र, गेल्या काही वर्षांत पाणपोईची संख्या घटू लागली असून, त्याची जागा आता ‘वॉटर एटीएम’ने घेतली आहे. पूर्वी मोफत मिळणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना लिटरमागे 1 ते 2 रुपये मोजावे लागत आहेत.
उन्हाच्या दाहकतेमध्ये प्रवास करून थकल्यानंतर या पाणपोई माठातील थंडगार पाणी प्यायल्यानंतर वाटसरूंना तरतरी यायची. गणेश मंडळे, सामाजिक संस्था-संघटना, पाणपोईची व्यवस्था करायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले असून, शहरासह ग्रामीण भागातील बहुतांशी पाणपोई बंद झाल्या आहेत.
आधुनिक काळानुसार जीवनशैलीतदेखील मोठ्या प्रमाणावर बदल होत चालले आहेत. पूर्वी एका शहरात शेकडो पाणपोई दिसून यायच्या. या पाणपोईंची जागा आधुनिक ‘वॉटर एटीएम’ने घेतली आहे. ग्रामीण भागातदेखील ठिकठिकाणी असे आधुनिक ‘वॉटर एटीएम’ बसविल्याचे दिसत आहे. या ऑटर एटीएममध्ये एक रुपयाला एक लिटर या दराने थंड पाणी मिळते. तसेच 1, 5 आणि 10 रुपये या एटीएममध्ये टाकून पाणी घेता येते.
पाणपोईमध्ये वापरण्यात येणाऱ्या डेऱ्याची स्वच्छता राखण्यात अनेक अडचणी येत होत्या. पाणपोई सुरू केली तरी त्याची योग्य ती निगा राखण्याकडे दुर्लक्ष व्हायचे. अशुद्ध पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. वॉटर एटीएम चालविणाऱ्या कंपनीकडून दररोज एटीएममधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून त्यात पाणी भरले जाते. त्यामुळे नागरिकांना शुद्ध व गार पाणी मिळण्यास मदत होते, असे एका वॉटर एटीएमचालक एंटरप्रायजेसच्या मालकाने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List