मंत्रालयात प्रवेशासाठी अत्याधुनिक प्रणाली, आता मंत्रालयात जाताना अवलंबन करावी लागणार ही पद्धत
Mantralaya entry system: राज्यातील मंत्रालयात प्रवेश आता हायटेक झाला आहे. मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर यापूर्वी काही गैरप्रकार झाले होते. मंत्रालयातून उड्या मारण्याचे प्रकारही घडले होते. मंत्रालयातील हे प्रकाकर रोखण्यासाठी नवीन सुरक्षा प्रणाली तयारी केली गेली आहे. त्या प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वीत करण्यात आली. तसेच टप्पा २ अंतर्गत प्रवेशासाठी ‘व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
फक्त त्या मजल्यावरच प्रवेश मिळणार
अभ्यांगतांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करता येणार आहे. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे. मंत्रालयात आलेल्या व्यक्तीचे त्या विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर दिलेल्या वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे लागणार आहे.
ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग अभ्यागतांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वाजता प्रवेश देण्यात येईल. तर दुपारी १२ नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यांगत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
दुपारी दोननंतरच मिळणार प्रवेश
मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना दुपारी २ वाजेनंतर प्रवेश देण्यात येणार आहे. डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲपवरुन प्रवेशपास घेऊन मंत्रालयात कोणालाही प्रवेश मिळणार आहे. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींना गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे.
आरएफआयडी कार्ड मिळणार
‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशाकरिता आरएफआयडी कार्ड वितरीत करण्यात येईल. हे आरएफआयडी कार्ड आधारे सुरक्षाविषयक तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागतांना आरएफआयडी प्रवेश ओळखपत्र घालून मंत्रालयात प्रवेश करावा त्यानंतर काम झाल्यावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List