‘…तर आदित्य ठाकरे यांची देखील नार्को टेस्ट करायला पाहिजे’; दिशा सालियन प्रकरणात कदमांची मोठी मागणी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं, यावरून त्यांनी निशाणा साधला, हे अर्थसंकल्पीय अधिवेश निरर्थक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यानंतर रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
‘उध्दव ठाकरे आता वेडे होऊन दगडं मारायचे बाकी आहेत. उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत असणाऱ्या सर्व नेत्यांना संपवण्याचं पाप केलं आहे. त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे. खरी शिवसेना आमचीच आहे, असं कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरून देखील निशाणा साधला आहे. मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट केले आहेत का? याची चौकशी होणे गरजेचं आहे. किशोरी पेडणेकर नेहमी दिशा सालियन प्रकरणात घरी का जायच्या? याचाही तपास होणे गरजेचे आहे. दिशा सालियनच्या वडिलांची नार्को टेस्ट करा अशी मागणी होत असेल तर आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी या प्रकरणात कदम यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुख प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मीक कराड याच्या सहकाऱ्यांनी हत्येची कबुली दिली आहे, त्यामुळे आता त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीड जिल्ह्यात 200 हून अधिक रिव्हॉल्व्हरचे परवाने देण्यात आले, परवाने देण्यासाठी कोणाच्या शिफारशी होत्या याचीही चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात धनजंय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा किती सहभाग आहे याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List