पुरुषाचा मसाज महिला करू शकणार, तज्ञ समिती तयार करणार मार्गदर्शक तत्त्वे हायकोर्टात फडणवीस सरकारची माहिती
स्पा, मसाज सेंटरमध्ये महिला पुरुषाचा व पुरुष महिलेचा मसाज करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार आहेत. हे काम 12 जणांच्या तज्ञ समितीला दिल्याची माहिती शुक्रवारी राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली.
स्पा, मसाज सेंटरवर पोलीस धाडी टाकतात व त्याचा नाहक त्रास या चालकांना होतो. हे टाळण्यासाठी स्पा, मसाज सेंटरचे नियमन करण्याकरिता 12 जणांची समिती तयार केली आहे. तसा शासन निर्णय 21 मार्च 2015 रोजी जारी केला आहे, अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाला दिली. भिन्न लिंगी मसाजाला दिल्ली सरकारने परवानगी दिली होती. त्याला तेथील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याचा विचार करून महाराष्ट्रात यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास समितीला सांगितले आहे, असेही महाधिवक्ता सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करताना स्पा, मसाज सेंटरवाल्यांचे म्हणणे ऐका. या समितीत महिला अधिकाऱयांचाही समावेश करावा, अशी सूचना न्यायालयाने केली. या समितीत महिला अधिकारी आहेत, असे महाधिवक्ता सराफ यांनी स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी समितीला 10 जूनपर्यंत मुदत दिली. सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी सुनावणीत सहकार्य केले.
समितीची जबाबदारी
- स्पा, मसाज सेंटरचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.
- दिल्ली सरकारने भिन्नलिंगी मसाजसाठी तयार केलेल्या नियमाला तेथील उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचा विचार करून मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.
- मद्रास उच्च न्यायालयाने स्पा, मसाज सेंटरसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याचाही अभ्यास समितीने करावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List