मोदी, मिंध्यांकडून पोलीस भरतीचे गाजर; आश्वासने नकोत, वेळापत्रक तयार करा; उमेदवारांची मागणी
विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तरुणांना पोलीस भरतीचे गाजर दाखवले. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत लाखो उमेदवारांनी भरतीसाठी तयारी केली; पण वाट्याला निराशाच आल्याने हे उमेदवार संताप व्यक्त करीत आहेत.
पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारांनी आपला संताप व्यक्त केला. सरकारने केवळ आश्वासने देऊ नयेत, एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी या उमेदवारांनी केली. राज्य सरकारकडून पोलीस भरतीची केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रिया वेळेत होत नाही. यात भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे या उमेदवारांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 हजार पदांची भरती लवकरच करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्राचारात धुळे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यास 25 हजार महिला पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हीच घोषणा केली होती.
सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 50 हजार पदांची भरती करण्यासाठी नियोजन करण्याचे प्रत्येक विभागाला सांगण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात साडेसात हजार पदांसाठी भरती करण्याची घोषणा करण्यात आली. यात बदल करून फेब्रुवारी महिन्यात दहा हजार पदांची पोलीस भरती करणार असल्याचे सांगण्यात आले.
फेब्रुवारी संपला तरी भरती प्रक्रियेसंबंधी कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याचे उमेदवारांनी सांगितले. विठ्ठल बडे, ज्ञानेश्वर बांगर, मंगेश जाधव, महादेव कोठे, रोहित कांबळे यांसह अनेक इच्छुक यावेळी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List