प्रशांत कोरटकरला नोटीस धाडा, हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश; अंतरिम जामिनाच्या मुद्यावर आज तातडीने सुनावणी
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणे प्रशांत कोरटकरच्या चांगलेच अंगलट येणार आहे. त्याच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आहे. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून कोरटकरला नोटीस धाडण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले आहेत. या याचिकेवर आज, मंगळवारी तातडीने सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन दिला आहे. मात्र अंतरिम जामीन न देता त्याच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य शासनाने अपील याचिकेत केली आहे. कोरटकरने अंतरिम जामिनाच्या काही अटींचे उल्लंघन केले आहे, असा दावाही राज्य शासनाने केला आहे.
या अपील याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्या. राजेश पाटील यांच्या एकल पीठासमोर सोमवारी करण्यात आली. त्याची दखल घेत या अर्जावर उद्या, मंगळवारी सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच कोरटकरला नोटीस देण्याचे आदेशही न्यायालयाने शासनाला दिले.
काय आहे प्रकरण
छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आपली भूमिका मांडली होती. हा ब्राह्मण द्वेष असल्याचा आरोप करत तथाकथित पत्रकार कोरटकरने इतिहास अभ्यासक सावंत यांना पह्न करून शिवीगाळ केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अटकपूर्व जामिनासाठी कोरटकरने कोल्हापूर न्यायालयात अर्ज केला. कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
आम्ही गंभीर
अशा घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होते. त्यामुळे कोरटकर प्रकरणात राज्य शासन गंभीर आहे, असा दावाही राज्य शासनाने या अपील याचिकेत केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List