मारल्या थापा भारी महाराष्ट्र केला कर्जबाजारी! उद्धव ठाकरे यांचा हल्ला
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात काहीच नावीन्य नसून तो बोगस आणि आभासी अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया देत ‘मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी’ असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. आचार्य अत्रे असते तर गेल्या दहा हजार वर्षांत इतका बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता असे म्हणाले असते. दहा हजार वर्षे नाही, पण गेल्या अनेक वर्षांत आपण असा अर्थसंकल्प पाहिला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनातील पत्रकार कक्षामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. या अर्थसंकल्पाचे सार काढले तर, उद्या सूर्य उगवणार आहे, सर्वांना प्रकाश मिळणार आहे, व्हिटॅमिन डीसुद्धा मिळेल, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे, असा टोला त्यांनी लगावला.
‘थापा मारून आता थांबणार नाही’ हेच महायुतीचे घोषवाक्य
निवडणूक काळात महायुतीने वारेमाप जाहिराती केल्या होत्या. त्यातील एक जाहिरात उद्धव ठाकरे यांनी उदाहरणादाखल दाखवली. त्या जाहिरातीखालील खालची ओळ बदलून त्याऐवजी ‘मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी’ ही ओळ घेऊन महायुतीने जाहिराती कराव्यात. ‘थापा मारून आता थांबणार नाही’ हेच महायुतीचे घोषवाक्य आहे असा चिमटा त्यांनी काढला.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर कधी करणार?
ईव्हीएम घोटाळा करून सरकार आणले, पण बहुमत मिळालेल्या सरकारने वचननाम्यात दिलेल्या दहा थापांपैकी एकतरी गोष्ट केली का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा त्यांनी त्यानिमित्ताने पुन्हा समाचार घेतला. उद्धव ठाकरे व्हायचे असेल तर लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असे आपण म्हणालो होतो, त्यापैकी काहीच या सरकारने केलेले नाही, असे ते म्हणाले. प्रत्येकाला अन्न व निवारा कधी देणार? सरकार तर स्थिर आहे मग जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर कधी करणार? नाहीतर बहुमताच्या सरकारला कोण किंमत देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱयांना 24 तास वीज द्या
शेतकऱयांना मोफत वीज देण्यापेक्षा 24 तास वीज द्या अशी मागणी आहे, पण आता त्यांना भरमसाट बिले यायला लागली आहेत. पूर्वीच्या थकबाकीचे काय, याकडेही उद्धव ठाकरे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. महायुतीने त्यांचा थापानामा, जुमलानामाच आज बाहेर काढला, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
मुंबई महापालिकेची स्वायत्तता कायम राखा
मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता सरकारने कायम राखली पाहिजे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मुंबई महापालिकेने सरकारकडून एक रुपयाही न घेता कोस्टल रोड उभारला आणि सरकारने मेट्रोसाठी महापालिकेच्याच तिजोरीतून तीन हजार रुपये काढले, असे ते म्हणाले.
दावोसला आम्ही कुबल लोणची, लिज्जत पापडला बोलावले नव्हते
दावोसमध्ये 15 लाख कोटींचे करार केले असून त्यातून 16 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता, महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेल्या करारांवर या सरकारने पुढे काय कार्यवाही केली? आम्ही कुबल लोणची, लिज्जत पापड यांना करार करायला दावोसला बोलावले नव्हते. चितळे बाकरवडीबरोबर करार करायचा झाला तर तो पुण्या, मुंबईतच करायला हवा असे उद्धव ठाकरे बोलताच पत्रकारांमध्ये हशा पिकला. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत काय केले ते सरकारने जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
विकास नव्हे, महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न
पंतप्रधान आवास योजनेच्या निमित्ताने खासगी विकासकांना 50 कोटींचा जादा निधी दिला जात असल्याबद्दल केंद्राकडून महायुती सरकारला विचारणा झाली. हा अर्थसंकल्प म्हणजे आभास योजना आहे. विकास नाही तर महाराष्ट्र खड्डय़ात घालण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न नव्हे तर ते कामही सुरू झाले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्पात मांडलेली अर्ध्याहून अधिक कामे ही पूर्वीच सुरू झाली होती. सोयाबीन आणि कापसाला हमीभाव तसेच पीक विमा घोटाळय़ाबद्दलही काहीच नाही, असेही त्यांनी माध्यमांच्या निदर्शनास आणले. लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा 36 हजार कोटी रुपये मंजूर केले होते. नंतरच्या काळात ती तरतूद 46 हजार कोटी रुपये करण्यात आली. आज म्हणाले 36 हजार कोटी. त्यातील 33 हजार कोटी रुपये खर्च केले म्हणतात, मग आधीच जाहीर करायला हवे होती की ही योजना फ्यूचरमध्ये करणार आहोत, म्हणजे लाडक्या बहिणींनीही फ्यूचरमध्ये मत देण्याचा विचार केला असता, अशी मिश्कील टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
मालकाच्या मित्रावर मेहेरबानी का?
मुंबई महानगर प्रदेशातील दोन विमानतळे मेट्रोने जोडण्याच्या घोषणेचीही उद्धव ठाकरे यांनी चिरफाड केली. अदानींना विमानतळे आंदण दिलीत तर ती मेट्रोने जोडण्याचे काम अदानींचे आहे, सरकारचे नाही, असे ते म्हणाले. केवळ मालकाच्या मित्राच्या हिताची कामे करताय का? असा सवाल करतानाच, नवीन विमानतळांचा विस्तार व विकास करताय, मग चिपी विमानतळ का बंद झाले तेसुद्धा सांगा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. मेट्रोवर खर्च करता मग बेस्टवर का करत नाही, असा सवाल त्यांनी केला.
महायुतीच्या जाहिराती पिजन होलमध्ये टाकायच्या का?
महायुतीच्या जाहिराती केल्या, पण जाहिरातींप्रमाणे काहीच केले नाही, मग या जाहिराती पिजन होलमध्ये टाकायच्या का? ही लोकांची फसवणूक आहे. चहूबाजूंनी फसवणूक करून सत्ता मिळवली आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्याविरोधात न्यायालयात जाणार का, अशा सवालावर, हरकत नाही, पण त्यात दोन-तीन निवडणुका जातील असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले. रस्त्यावर उतरायचे ठरवले तर सर्वत्र खड्डे करून ठेवलेत, उतरणार कुठे, असेही ते म्हणाले.
…हा मुंबईचा नव्हे, कंत्राटदारांचा विकास
सरकारने विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये, 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार, अंगणवाडी व आशा सेविकांना सुरक्षा कवच देणार, सौर ऊर्जेबाबत शेतकऱयांना वचन दिले होते, पण सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केलेले नाही, लाडक्या कंत्राटदारांसाठी मात्र भरपूर तरतूद केली आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत 64 हजार 893 कोटींची विकासकामे करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली, हा मुंबईचा नव्हे तर कंत्राटदारांचा विकास आहे, असे ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List