कोथरुडमधील दहशत संपता संपेना, मारहाणीची घटना ताजी असतानाच खुनाचा प्रकार
कोथरूड परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेल्या आयटी अभियंत्याला बेदम मारहाणीची घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोथरूडमध्ये पुन्हा एकदा गुंडाच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन धुमाकूळ घातला. तरुणावर गोळीबार करत तलवार, कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढविली होती. मात्र, पुन्हा एकदा टोळक्याने तरुणाचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
गौरव अविनाश थोरात (वय 22, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सागर वसंत कसबे (वय 47, रा. पीएमसी कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. दिनेश भालेराव (वय 27), सोहेल सय्यद (वय 24), राकेश सावंत (वय 24), साहिल वाकडे (वय 25), बंड्या नागटिळक (वय 18), लखन शिरोळे (वय 27), अनिकेत उमाप (वय 22) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गौरव थोरात आणि आरोपींमध्ये काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्याच रागातून टोळक्याने रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गौरव थोरात याला शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळ गाठले. तो मित्रांसोबत गप्पा मारत बसल्याची संधी साधून सोहेल सय्यद साथीदारांसह तिथे गेला. सोहेलने गौरवच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने गोळी गौरवला लागली नाही. त्यानंतर टोळक्याने त्याच्यावर तलवार, सत्तूर, कोयत्याने वार करून त्याचा खून केला.
मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने तरुणाचा खून केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, उपायुक्त संभाजी कदम, एसीपी भाऊसाहेब पठारे, अजय परमार, राजेंद्र मुळीक, गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुण्यात काही घटना घडल्या असून, काही गोष्टी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कमी आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी मी पुणे पोलिसांना सूचना केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटले पाहिजे. ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने पोलीस काम करीत आहेत, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
घटनास्थळावरून गावठी पिस्तुल, तलवार, सत्तूर जप्त
खून झालेल्या ठिकाणाहून पोलिसांनी गावठी पिस्टल, तलवार, सत्तूर जप्त केले आहे. गौरव थोरात याच्या खूनप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, कोथरूड परिसरात कुख्यात गजा मारणे टोळीने आयटी अभियंत्याला केलेली मारहाण, तरुणाच्या खुनामुळे महिलांसह नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List