‘राज्य मी आणणार, त्यांना सोडणार नाही, विरोधकांची दांडी उडवणार…’, उद्धव ठाकरे यांचा कोणा कोणावर हल्ला?
uddhav thackeray speech: शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी ईशान्य मुंबईत निर्धार शिबीर घेतले. या शिबिरातून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. रविवारी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु होता. त्याचा संदर्भ घेत त्यांनी विरोधकांची दांडी उडवणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात आपली सत्ता मी आणणार, त्यांना सोडणार नाही. आम्ही जय श्रीराम बोलू, पण भाजपला जय शिवाजी, जय भवानी बोलण्यास लावू. प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, मला स्कोअरची चिंता नाही. विरोधकांची दांडी उडवणार आहे. सामना दुबईत सुरु आहे. टीव्हीवर सामना बघू शकतो. त्यासाठी दुबईत जाण्याची काय गरज? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे सांगणारे लोक दुबईत गेले होते. ते भारत पाक सामना पाहात होते. फोटो काढत होते. पाकिस्तानी खेळाडू शेजारी बसले होते. भाजप नेत्यांचे घराणेशाही वाले जय शाह गेले होते. ती लोक आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहे का? उद्धव ठाकरे गेले असते किंवा आदित्य ठाकरे दुबईत गेले असते तर गदारोळ केला असतात. मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे गेले नाही अजून पण गेल्यावर त्यांनी काय केले असते? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
भाजपचे फेक नेरेटीव्ही…
भाजप देशप्रेमी आहे, हे फेक नेरेटीव्ही आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशासंदर्भात चांगली भूमिका घेत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. परंतु ते आता आम्हाला देशप्रेम शिकवत आहे. ज्यांच्या स्वातंत्र्यसंग्रमाशी संबंध नाही, त्यांच्याकडे देशाची सूत्र गेली आहेत. संघवाले गच्चीवर लाठी काठ्या घेऊन बसतात. ते लोक आम्हाला हिंदुत्व शिकवतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संघावर केली.
प्रयागराजला का गेले नाही?
उद्धव ठाकरे यांनी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात का गेले नाही? त्याची उपहासात्मक कारण सांगितले. ते म्हणाले, आम्ही मोहन भागवतचे फॉलोवर आहोत. ते जे करतात ते आम्ही करतो. मोहन भागवत गेले नाही तर मी कसा प्रयागराजला जावू. ते स्वत: जात नाही आणि लोकांना सांगतात. उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यात फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन दाखवा. २१०० रुपये लाडक्या बहिणींना जाहीर करुन दाखवे. मग माझी बरोबरी करावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List