मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा..
दिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं आहे, या वक्त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
‘अमित शाह यांच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल त्यांच्या पक्षाबद्दल शिवसेनेबद्दल जो द्वेष आहे तो वारंवार या निमित्ताने बाहेर पडत आहे, मुंबई गुजरातला जोडण्याचं काम या गद्दाराच्या साथीने कपट कारस्थानाने सध्या सुरू आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी आम्ही काम करतोय, जनतेलाही हे माहीत आहे, प्रत्येक भाषणात तुम्हाला ऊद्धव ठाकरेंचा विषय का काढावा लागतो याचं त्यांनी उत्तर द्यावं.
नीलम गोऱ्हे यांना सगळ्यात जास्त पद शिवसेनेनं दिली. आयत्या बिळात बसून नीलम गोऱ्हे यांनी पद मिळवली. जुन्या जाणत्या महिलांना डावलून 4 टर्म आमदार झाल्या. माझं आव्हान आहे त्यांना, त्यांनी शपथ घेऊन सांगावं की तुम्ही किती मर्सिडीज बेंझ गाड्या दिल्या? लाचारी पत्कारून कोणाला तरी सुखावण्यासाठी आरोप करायचे, अशा राजकारण्यांचा धिक्कार करतो’ असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान ठाण्यात भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालत आहे, एकमेकांच्या ऊरावर बसत आहेत , यादवी युद्ध सुरू झालंय, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल करण्याचं काम सुरू आहे, ठेकेदारांना पैसे देत नाहीत, लाडकी बहीण योजनेत ६० लाख बहिणी अपात्र होणार आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही योजना बंद होईल असं वाटत आहे, अशी टीकाही यावेळी विनायक राऊत यांनी सरकारवर केली आहे. दरम्यान निलम गोऱ्हे यांच्या आरोपानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे, पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List