साहित्य संमेलनातील मर्सिडीज पुराण, राज्यात आले तुफान, ठाकरेंविरोधात जुन्या सहकाऱ्याने पाजळली तलवार
आता शिंदे गटात स्थिरावलेल्या उद्धव सेनेच्या जुन्या शिलेदाराने मराठी साहित्य संमेलनात स्फोटक वक्तव्य केले. या वक्तव्याने राज्यातील राजकारणात खळबळ कसली गजहब माजला. आतापर्यंत जुन्या जाणत्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना मर्यादा पाळल्याचे दिसून आले. पण या बड्या नेत्याने उद्धव सेनेतील व्यवहार ज्ञानावर प्रकाश टाकून मोठा दणका दिला. अर्थात या आरोपाला संजय राऊत आणि दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच प्रत्युत्तर दिले आहे.
साहित्य संमेलनात मर्सिडीज पुराण
मराठी साहित्य संमेलनात राजकीय वादाची ठिणगी तशी नवीन नाही. यापूर्वी साहित्य संमेलनाच्या आडून अनेक वादांनी कुरघोडी केली होती. त्यात सामाजिक, जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला होता. आता साहित्य संमेलनात राजकीय वादातून काय कुरघोडी करण्यात आली, याचे गणित तुम्हीच मांडा.
‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव सेनेवर तोफ डागली. ठाकरे सेनेतील कार्यकाळाचा आढावा घेताना उणीवा शोधताना त्यांनी मर्सिडीज पुराण बाहेर काढले. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे एकच गजहब उडाला. अर्थात, आपण सेनेत असताना एकही पैसा दिला नाही की त्यांनी मागितला नाही असे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
माझा अपवाद वगळला तर बाकी ठिकाणी या गोष्टी घडत होत्या, असे नीलमताई म्हणाल्या. 2014 नंतर आणि विशेषतः 2019 नंतर आमदारांची जशी कामं व्हायला हवी होती. काही गोष्टी प्राप्त झाल्यानंतर काही गोष्टी मिळायच्या. तो संदर्भ आपण दिल्याचे नीलमताई म्हणाल्या. लोकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते. त्यांना भेटायला पाहिजे होते, तिकडे पक्षाने दुर्लक्ष केले असे आपल्याला म्हणायचे होते, असे त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांचा घणाघात
नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली. हे सगळे गयेगुजरे लोकं आहेत. त्यांनी स्वत: चांगभल करून घेतलं आहे. त्या महिला आहेत त्यावर मी काही बोलणार नाही. मर्सडीज मधून फिरणाऱ्या लोकांना विचारा लाडक्या बहिणींना पैसे का नाही मिळाले. स्वत: मर्सडीज मधून फिरतायत मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या?, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले. तर त्यांना 4 वेळा आमदार केले उध्दव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडिज दिल्या? 8 मर्सिडिज दिल्या का? त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List