‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, पंकजा मुंडे यांचे वक्तव्याची राज्यभर चर्चा
‘एक छंद मकरंद’ या गीताने अनेकांच्या दिवसांची सुरुवात होते. हे गीत आताच आठवण्याचे कारणही तसेच आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे’ पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, असे सांगायला पंकजाताई विसरल्या नाहीत. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याने कधीकाळी भाजपात मोठी ठिणगी उडाली होती. राज्य भाजप मोठ्या कोंडीत सापडला होता. आता ही जणू तसाच पेचप्रसंग उभा राहणार का? की ‘बदला नाही बदल होणार’ या मंत्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजाताईंच्या या वक्तव्याकडे हसून दुर्लक्ष करणार ही चर्चा भाजपतच कशाला सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे.
मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा त्यांचे आवडते तार छेडले आहेत. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, मला फक्त ओबीसींच नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे.’ असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने राजकारणातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना आताच हे वक्तव्य का करावसं वाटलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
बीड प्रकरण हे पंकजा मुंडे यांच्या गळ्याशी आल्यानेच ते विविध मुद्दे उकरून काढत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा पंकजा मुंडे या आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी मुंडे यांच्यावर टीका सुद्धा केली होती.
मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय
“ओबीसी समाजाचं नेतृत्व असा माझा उल्लेख केला जातो. मला ओबीसी नेतृत्वाच्या पुढे जाऊन सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे. वंजारी-मराठा अथवा ओबीसी-मराठा हा वाद मिटवण्यासाठी किंवा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे. फक्त हे प्रयत्न कुणी हाणून पाडू नयेत, इतकीच अपेक्षा आहे.” असे वक्तव्य मंत्री मुंडे यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य नेमकं कुणासाठी आहे यावरही खल करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List