स्वारगेट एसटी आगरात सुरक्षेचे तीन तेरा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, पहिल्यांदाच घेतला मोठा निर्णय
पुणे येथील स्वारगेट एसटी महामंडळाच्या आगारात काल मुलीवर अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर राज्य सरकारच नाही तर एसटी महामंडळाने धडाधड निर्णय घेतले. याप्रकरणाच्या मुळाशी जात सुरक्षा यंत्रणेपासून एसटीच्या बकाल अवस्थेपर्यंत अनेक गोष्टी बदलण्याचा चंग बांधण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आताच पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. काय होणार आहेत आता बदल, जाणून घ्या…
काय म्हणाले परिवहन मंत्री?
पुण्यातील अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी भूमिका जाहीर केली. हा प्रकार एसटी महामंडळाच्या आगारात घडली आहे. त्यामुळे ही जबाबदारी आम्ही झडकत नसल्याचे ते म्हणाले. पण त्याचवेळी स्वारगेट आगारातील सीसीटीव्हीमुळेच आरोपीची ओळख पटली. त्याचा मागोवा घेण्यास मदत झाली असे ते म्हणाले. यापुढे महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर पावलं टाकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मनुष्यबळातही महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत सुरक्षा चोख ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
जीपीएस आणि एआयची मदत
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीविषयीची माहिती दिली. त्यानुसार, सध्या महामंडळाच्या ताफ्यात 14,300 बस आहेत. 400 बसेस इलेक्ट्रिक तर 350 बसेस भाडेतत्त्वावर आहेत. या सर्व बसमध्ये जीपीएस आणि एआय प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय आज घेतलेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर स्वारगेट आगारात ज्या बसमध्ये ही घटना घडली, तिचा दरवाजा आरोपीने उघडला. याचा अर्थ त्याला याविषयीची माहिती होती, त्यामुळे या विषयासंदर्भात पण गांभीर्याने उपाय योजनेवर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
महामंडळात स्क्रॅपिंग पॉलिसी
महामंडळाच्या अनेक बसची दुरावस्था झाली आहे. त्यातील अनेक बस मोडकळीस आलेल्या आहेत. तर एसटी महामंडळाच्या आगारात अनेक मोडकळीस आलेली वाहनं सुद्धा उभी आहेत. ही सरकारी वाहनं लवकरच स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत काढण्यात येणार आहे. त्यामुळे या बंद पडलेल्या वाहनात जे गैरप्रकार चालतात, त्यांना आळा घालता येईल असे ते म्हणाले. 15 एप्रिल ही त्यासाठीच अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. त्यापूर्वीच ही वाहनं स्क्रॅप, भंगारात देण्यात येतील.
2700 सुरक्षा रक्षक, महिलांचा टक्का वाढवणार
सध्या महामंडळाकडे 2700 सुरक्षा रक्षक आहेत. पण त्यात महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे महिलांचा टक्का 10-15 टक्के वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सरनाईक म्हणाले. महामंडळाच्या कान्याकोपऱ्यात आता एआय कॅमेरे बसवण्यात येतील. कंट्रोल रूममधून त्याचे मॉनिटरिंग करण्यात येईल.
महामंडळाला आयएएसच्या धरतीवर एक आयपीएस अधिकारी देण्याची मागणी परिवहन खाते राज्यासह केंद्राकडे करणार आहे. त्यामुळे महामंडळातील मोकळ्या जागा, अडोशाच्या जागा आणि फलाटावरील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी मदत होईल, असे मत सरनाईक यांनी मांडले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List