‘अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’मुळे शाळेतील विद्यार्थी बिघडतायत’; शिक्षिकेची तक्रार
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी हैदराबादमधील युसुफगुडा इथल्या एका सरकारी शाळेतील शिक्षक चित्रपटावर नाराज आहेत. ‘व्ही 6 न्यूज’ने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये या शाळेतच्या शिक्षिकेनं शिक्षण आयोगाकडे चित्रपटाबाबत तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांवर ‘पुष्पा’चा वाईट प्रभाव पडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शाळेत जेव्हा विद्यार्थी बेजबाबदारपणे वागतात तेव्हा ‘प्रशासक’ म्हणून आपण अपयशी ठरत असल्याची भावना मनात असल्याचं शिक्षिकेनं म्हटलंय.
“शाळेतली मुलं विचित्र हेअरस्टाइल करतात, अश्लील बोलतात. आपण फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतोय आणि याकडे दुर्लक्ष करतोय. ही परिस्थिती केवळ सरकारी शाळांमध्येच नाही तर खाजगी शाळांमध्येही आहे. प्रशासक म्हणून मला असं वाटतं की मी अपयशी ठरत आहे”, अशी तक्रार शिक्षिकेनं बोलून दाखवली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याने त्यांच्यावर दबाव येऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अशा बेजबाबदार वर्तनासाठी त्यांनी मास मीडियाला दोषी ठरवलं आहे.
“आम्ही त्यांच्या पालकांना या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलं तरीही त्यांना काही वाटत नाही. तुम्ही त्यांनी शिक्षादेखील करू शकत नाही, कारण त्यामुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा दोष मी मास मीडियाला देते. पुष्पासारख्या चित्रपटामुळे माझ्या शाळेतील अर्धे विद्यार्थी आणखी बिघडले आहेत. शाळेतल्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल याचा कोणताही विचार न करता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं आहे”, अशी टीका संबंधित शिक्षिकेनं केली आहे.
शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘शिक्षिकेनं बरोबर म्हटलंय. अशा प्रकारच्या चित्रपटांचा विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो’, असं एकाने म्हटलंय. तर ‘तुम्ही काही चांगलं बोलू शकत नसाल तर ठीक आहे. पण किमान आणखी वाईट तरी बोलू नका’, अशी टीका ‘पुष्पा’च्या चाहत्याने केली. ‘मग गेम चेंजर आणि महर्षीसारखे चित्रपट पाहून विद्यार्थी लगेच आयएएस अधिकारी किंवा शेतकरी बनतील का’, असा उपरोधिक सवालही काहींनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List