‘पैसे येणं बंद झालं म्हणून हा मार्ग निवडलाय’; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचं सडेतोड उत्तर
मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वात दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. पती अविनाश नारकर यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर त्या विविध रील्स पोस्ट करत असतात. अविनाश आणि ऐश्वर्या यांचे रील्स चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. काही वेळा त्यांना रील्समुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ते बिनधास्त डान्सचे आणि अभिनयाचे रील्स पोस्ट करताना दिसतात. ऐश्वर्या यांनी नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी या फोटोंवरून ऐश्वर्या यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशाच एका ट्रोलरला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी साडी नेसून नदीच्या पाण्यात हे फोटोशूट केलंय. त्यांच्या मादक अदा आणि सौंदर्य हे आजच्या तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं आहे. मात्र याच फोटोशूटवरून काही नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. ‘तुमच्या वयाला हे शोभत नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आता सिनेमे करून पैसे येणं बंद झालं. कारण आता चित्रपट घेऊन कोण येतच नाही. मग आता आर्थिक साधन म्हणून हा मार्ग निवडलाय. आपण काही वर्षांपूर्वी लहान-थोरांचे, तरुणांचे आदर्श आणि आवडते कलाकार होतता. या भावनेची तरी कदर करा’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने टीका केली. या युजरला ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘आपल्या अगाध ज्ञानाबद्दल काय बोलावं? स्वत:ची अक्कल पाझळण्याआधी माहिती करून घ्यावी,’ अशा शब्दांत त्यांनी नेटकऱ्याला उत्तर दिलं आहे. ऐश्वर्या यांनी याआधीही ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. ट्रोलिंगबद्दल एका मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडलं होतं. “सोशल मीडियावर आपलं कौतुक करणारेही असतात आणि आपल्यावर टीका करणारेही असतात. पण आपण किती जणांना उत्तर देत बसणार? चिखलात किती दगड फेकावेत यालाही एक मर्यादा असते. त्यामुळे मी सहसा आता अशा नकारात्मक कमेंट्सचा फार विचार करत नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List