माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीची 2 निर्मात्यांकडून फसवणूक, 4 कोटी उकळले आणि…
सिनेमात हिरोईन करतो सांगून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीची 2 निर्मात्यांकडून फसवणूक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल 4 कोटी रुपये निर्मात्यांनी उकळले आहेत. उत्तराखंड येथील माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांची मुलगी आणि अभिनेत्री आरुषी निशंक हिची दोन निर्मात्यांनी फसवणूक केली आहे. आरुषी हिची फसवणूक करणाऱ्या निर्मात्यांचं नाव मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला असं आहे. दोघांवर चार कोटी रुपयांची फसवणूक, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी देहराडूनच्या कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कशी झाली फसवणूक ?
चित्रपट निर्मिती आणि अभिनय क्षेत्रात काम करणारी आरुषी निशंक हिने सांगितल्यानुसार, दोन निर्मात्यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. दोन निर्माते आरुषी हिच्या घरी आले होते. एका फिल्म्स प्रॉडक्शन लिमिटेडचे डायरेक्टर असल्याचा दावा करत ‘आंखो की गुस्ताखियां’ सिनेमा तयार करत आहोत असं सांगितलं.
सिनेमात शनाया कपूर आणि अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत होते. सिनेमासाठी आणखी एका मुख्य अभिनेत्रीची गरज होती. आरुषीने आरोप केला की निर्मात्यांनी सांगितलं की, जर तिने या सिनेमात 5 कोटी रुपये गुंतवले तर तिला केवळ ही भूमिकाच मिळणार नाही तर सिनेमाच्या एकूण नफ्याच्या 20% देखील मिळतील.
एवढंच नाही तर, जर तिला ही भूमिका आवडली नाही किंवा ती समाधानी नसेल तर तिने दिलेली संपूर्ण रक्कम 15% व्याजासह परत केली जाईल, असे आश्वासनही आरुषी हिला त्या दोन निर्मात्यांनी दिलं. आरुषी म्हणाली, निर्मात्यांनी तिचं प्रमोशन केलं नाही. तिला स्क्रिप्ट देखील सांगितली नाही. शिवाय सिनेमातून आरुषीला बाहेरचा रस्ता दाखवला.
जेव्हा आरुषी हिने पैसे परत मागितले, तेव्हा तिला सांगण्यात आलं की, सिनेमातं शूटिंग भारतात पूर्ण झालं असून आता शूटिंग युरोपमध्ये करायचं आहे. तिच्या जागी आता दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचेही सांगण्यात आलं.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
आरुषीने दोन्ही निर्मात्यांविरुद्ध फसवणूक, मानसिक छळ, धमकावणे, गुन्हेगारी कट आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरुषीने पोलिसांनी तातडीने कारवाई करून फसवून उकळलेले 4 कोटी रुपये परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List