‘छिन्न अवस्थेत बाहेर पडलो, डोळ्यातलं पाणी..’; ‘छावा’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. क्लायमॅक्स सीन पाहिल्यानंतर अक्षरश: पाणावलेल्या डोळ्यांनी प्रेक्षक थिएटरबाहेर येताना दिसत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवला जातोय. अशाच एका मराठी अभिनेत्याने ‘छावा’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘छावा कादंबरी संपवल्यानंतर जी छिन्न अवस्था होते, तशाच अवस्थेत बाहेर पडलो. गाडी काढेपर्यंत डोळ्यातलं पाणी खळतत नव्हतं’, असं या अभिनेत्याने लिहिलंय. अभिजीत चव्हाण यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिजीत चव्हाण यांची पोस्ट-
‘मध्यरात्री चित्रपट संपला. छावा कादंबरी संपवल्यानंतर जी छिन्न अवस्था होते, तशाच अवस्थेत बाहेर पडलो. गाडी काढेपर्यंत डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. खूप दुर्मिळ क्षण असतात हे. या क्षणांसाठी लक्ष्मण उतेकर सर तुमचा आभारी आहे. मराठयांचा धगधगता ज्वलंत इतिहास आजवर दडपला गेला, जाणूनबुजून बदलला गेला. त्यात शंभूराजांसाखे खरे धर्मवीर होरपळले गेले. तो इतिहास तितक्याच भव्यतेने सर तुम्ही रजतपटावर आणून आम्हाला उपकृत केलंत. मी समीक्षक नाही पण जे भिडलं ते आणि तसंच लिहितोय. विकी कौशलने छावा साकारताना प्राण ओतलेयत तीच अवस्था अक्षय खन्ना औरंगजेब साकारताना.. निशब्द… ए. आर. रहमानचं संगीत सोडल्यास चित्रपटाने कहर केलाय. माझ्या लाडक्या संत्याचं (संतोष जुवेकर) काम त्याच्यासारखंच देखणं. यांची दृश्य बघताना अक्षरशः चेव चढतो. नकळत हाताच्या मुठी आवळल्या जातात, दात-ओठ चावले जातात. इतका जबरदस्त परिणाम साधतो चित्रपट. सगळ्या टीमचे आभार. आम्हाला संपूर्ण अनुभव देण्यासाठी. चित्रपट सगळे रेकॉर्ड्स मोडेल यात शंकाच नाही. आवर्जून बघा.. ओटीटीवर येण्याची वाट बघू नका. चित्रपटगृहात जाऊन बघा आणि संगरात न्हाऊन जा. जय शिवराय. हर हर महादेव,’ अशा शब्दांत अभिजीत यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
‘छावा’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाचे सर्व शोज हाऊसफुल आहेत. अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List