धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
मुंबई: धारावीतील रहिवाशांना चांगले घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकाराला येत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत (DRP) बुधवारी, १२ फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या धारावीतील तब्बल ५० हजारहून अधिक घरांचे प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
“पुनःसर्वेक्षणामुळे होणाऱ्या विलंबाचा तूर्तास आम्ही विचारही करू शकत नाही. कारण, आम्ही एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना करत आहोत. प्रकल्प वेगाने पू्र्ण होण्यासाठी रहिवाशांचे पूर्ण सहकार्य आवश्यक आहे. ज्यांनी अद्याप सर्वेक्षणात भाग घेतलेला नाही, त्यांनी आपल्या कागदपत्रांसह स्वत: हून पुढे येऊन सहकार्य करावे,” असे DRP चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काही म्हटले होते.
सर्वेक्षणाच्या नव्या आकडेवारीनुसार, ८५ हजार झोपड्यांची क्रमवार नोंदणी पूर्ण झालेली आहे. ५० हजारहून अधिक झोपड्यांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
“धारावीतील गुंतागुंत, अंतर्गत भागात फिरताना येणारी आव्हाने, तसेच खूप मोठी लोकसंख्या पाहाता आशियातल्या या सर्वांत मोठ्या झोपडीपट्टीच्या नकाशाचे काम पूर्ण करताना ५० हजार घरांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण होणे ही लक्षणीय बाब आहे असे धारावी पुनर्विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
१.५ लाख झोपड्यांचे पुनर्वसन
धरावीचा पुनर्विकास हा भारतातील सर्वांत मोठा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे. सुमारे १० लाख लोकांचे निवासस्थान असलेल्या धारावीला आधुनिक शहरी केंद्रात रूपांतरित करण्याचा हा प्रकल्प आहे. सुमारे १.५ लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. धारावीतील नागरिकांना उत्तम घरे, पायाभूत सुविधा आणि आर्थिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
“गेल्या काही दशकांत झालेल्या अनेक अपयशी प्रयत्नांनंतर अखेर धारावीचा पुनर्विकास प्रत्यक्षात सुरू झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो झोपडपट्टी पुनर्विकासातला मैलाचा दगड ठरेल. यातून आम्ही सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नक्कीच सूचित होते, असे NMDPL चे प्रवक्त्त्यांनी म्हटले आहे.
झोपड्यांची संख्या सुमारे १.५ लाखांपर्यंत वाढली
मशालने २००७-०८ मध्ये केलेल्या पूर्वीच्या सर्वेक्षणात धारावीत सुमारे ६० हजार पात्र झोपड्यांची नोंद केलेली होती. सध्याच्या अंदाजानुसार, बहुतेक झोपड्या आता तळमजला आणि वर अधिकचे दोन मजले या स्तरांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे पुनर्वसन आवश्यक असलेल्या झोपड्यांची संख्या सुमारे १.५ लाखांपर्यंत वाढली आहे.
अपात्र रहिवाशांचे धारावी बाहेर पुनर्वसन
“सध्याच्या निविदेतील तरतुदींनुसार वरच्या मजल्यांवरील लोकांचाही समावेश केला गेला आहे. सर्वांसाठी घर या सरकारी धोरणाचा भाग होण्याचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे,” असे NMDPL च्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. पात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करण्यात येईल. तर अपात्र रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेशात आधुनिक सुविधा आणि सर्वसमावेशक सोयींसह विकसित केल्या गेलेल्या टाउनशिपमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे , असे निविदेच्या अटीत म्हटले आहे.
एमएमआर रिजनमध्ये टाऊन शिप
इतर अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांप्रमाणे रहिवाशांना उंचच-उंच इमारतींमध्ये स्थलांतरित न करता थेट नियोजित टाऊनशिपमध्ये स्थलांतरित केले जाईल. या टाउनशिपमध्ये प्रशस्त रस्ते, उदयाने, तसेच योग्य पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या आवश्यक सुविधा चोख असतील. याशिवाय, या टाउनशिपमध्ये मल्टी-मोडल परिवहन केंद्रे देखील असतील.
“या टाउनशिपमध्ये शाळा, आरोग्य सुविधा, खेळाची मैदाने, सामुदायिक केंद्रे आणि खरेदी संकुले असतील. हा पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा केवळ स्थलांतरित धारावीकरांचे जीवनमान सुधारणार नाही, तर संपूर्ण परिसर आणि मुंबईकरांच्या जीवनशैलीतही सकारात्मक बदल घडवेल,” असे प्रवक्त्याने म्हटले आहे.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List