छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक उभारा; उदयनराजे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि एकंदरित सर्वच महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक शासन असणारा कायदा पारित करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे, आदी मागण्या छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्या आहेत.
उदयनराजे यांनी अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्याशी मागण्यांसंदर्भात चर्चा करत निवेदन दिले. उपरोक्त मागण्यांबरोबरच, ऐतिहासिक चित्रपटांच्या चित्रीकरणाचे सिनेमॅटिक लिबर्टीचे नियमन करण्यासाठी समिती स्थापन करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, आदी मागण्याही उदयनराजे यांनी शहा यांच्याकडे केल्या. यावेळी काका धुमाळ, अॅड. विनित पाटील उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा वारसा अतुलनीय आहे. संपूर्ण देशात आणि जगात त्यांच्याविषयी विशेष आदर आहे. मात्र, अलीकडच्या काळात छत्रपती शिवराय यांच्या जीवनचरित्राविषयी अवमानकारक शेरे आणि टिपण्या करून तमाम शिवप्रेमी लोकांच्या भावना दुखावल्याची उदाहरणे समोर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि एकंदरित सर्वच महापुरुषांबाबत अशा जाणूनबुजून, खोडसाळपणाने अवमानकारक शेरेबाजी आणि टिपण्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई होण्यासाठी कठोर कायदा पारित करावा, अशी आमच्यासह शिवभक्तांची इच्छा आहे.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकूणच जीवनकार्य आणि स्वराज्य निर्मितीचे योगदान जागतिक स्तरावर नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक स्थापन केले पाहिजे. शिवरायांच्या इतिहासावरील राष्ट्रीय समिती स्थापन करणे आवश्यक आहे. त्यांच्याशी संबंधित अप्रकाशित, दस्तावेज, चित्रे, शस्त्रास्त्रे आणि इतर ऐतिहासिक नोंदी एकत्रित संशोधित आणि संकलित करण्यात याव्यात, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
अनेकदा वादग्रस्त पैलूंकडे दुर्लक्ष
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित असंख्य चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि माहितीपट तयार केले जातात. तथापि यापैकी बऱ्याच कलाकृती विकृत आणि काल्पनिक सादर केल्या जातात. तोच इतिहास खरा मानला जातो. या काल्पनिक आवृत्त्यांमुळे वादही उफाळून येतो. जातीय तेढ निर्माण होते. याबाबत नियमन करण्याची जबाबदारी सेन्सॉर बोर्डाची असली, तरी अनेकदा वादग्रस्त पैलूंकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे खोट्या कथेचा प्रसार होतो. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने सेन्सॉर बोर्डाला मदत करण्यासाठी इतिहासकार, संशोधक आणि तज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणीही उदयनराजे यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List