…तर नीलम गोऱ्हेंची कुंडली बाहेर काढू! अशोक हरणावळ यांचा इशारा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर किंवा ‘मातोश्री’बाबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तुमची कुंडली पुराव्यानिशी बाहेर काढू, असा सज्जड दम शिवसेनेचे माजी गटनेते अशोक हरणावळ यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना नीलम गोऱ्हे यांची जीभ घसरली. त्या पार्श्वभूमीवर बोलताना हरणावळ म्हणाले, आम्ही सत्तेसाठी शिवसेनेसोबत नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसैनिक असल्याने सत्ता आली काय आणि गेली काय आम्हाला फरक पडत नाही. आमचं ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीबरोबर रक्ताच्या नात्यापलीकडचं एक नातं आहे.
लोकमतातून निवडून आलेले नसतानादेखील शिवसेनेने गोऱ्हे यांना चार वेळा विधान परिषद दिली. सत्तेचे पेढे तुम्ही खाल्ले. त्यामुळे बोलताना भान ठेवले पाहिजे. जर यापुढे मातोश्री, ठाकरे कुटुंबाबद्दल असे काही वक्तव्य केल्यास पुराव्यानिशी आम्ही तुमची कुंडली बाहेर काढू, असा इशारा हरणावळ यांनी दिला.
आजही दुचाकीवर
जे आमच्या पोटात आहे तेच आमच्या ओठावर आहे. कालही आम्ही दुचाकीवर होतो, आजही आम्ही दुचाकीवर आहे आणि उद्याही आम्ही दुचाकीवरच असू. आम्हाला कसल्याही पैशाचा मोह नाही. आमच्याकडे काही नाही, त्यामुळे ईडीची कारवाई होऊ शकत नाही. आमच्यावर राजकीय गुन्हे आहेत. एखादा क्रिमीनल गुन्हा दाखल करण्यापलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही, असेही हरणावळ म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List