ब्याडगी, जवारी मिरचीला ग्राहकांची पसंती
गडहिंग्लज तालुक्यातील खेडोपाडी कर्नाटकातून ब्याडगी व जवारी मिरचीची सध्या मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातून विक्रेते गावोगावी जाऊन गल्लीबोळात आरोळी देऊन मिरची विकत आहेत. या मिरचींचा दर किलोला 140 रुपये असा आहे. या मिरच्या स्वस्तात मस्त एकाच दरात मिळत असल्याने ग्राहकांच्यादेखील उड्या पडताना दिसत आहेत.
दरवर्षी जानेवारीपासून बाजारात मिरच्यांची आवक सुरू होते. यामध्ये जवारी व ब्याडगी अशा दोन प्रकारच्या मिरच्या प्रामुख्याने ग्राहक खरेदी करतात. जवारी मिरची ही लांबलचक व लाल भडक असते. यामध्ये संकेश्वरी, स्पायसी, कर्नाटकी गरुडा आदी प्रकार आहेत. या मिरचीची पूड तिखट होते. याच्या जोडीला ब्याडगी मिरची घेतली जाते. ही मिरची दिसायला भरदार फुगलेली असते. यामध्ये तिखटपणा कमी असतो, मात्र मिरची पुडला लाल भडक रंग येतो. त्यामुळे तिखटपणा व रंग येण्यासाठी जवारी व ब्याडगी या दोन्हीही मिरच्या एकत्रित मिसळून मिरची पूड तयार केली जाते.
खास करून कोल्हापुरी जनतेची याला मोठी पसंती असते.
गडहिंग्लजमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मिरचीची प्रसिद्ध मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी मिरचीचा सौदा होतो. येथील जवारी मिरचीला एक वेगळीच चव असल्याने कोल्हापूर, मुंबई, पुणे व कोकणात मोठी मागणी असते. सध्या गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ, मुत्नाळ, हेब्बाळ या भागातील जवारी मिरचीची आवक सुरू आहे. या मिरचीचा दर 180 पासून सुरू आहे. या मिरचीची आवक पुढील महिन्यापासून कमी होत जाते.
सध्या कर्नाटकातून जवारी व ब्याडगी मिरची गडहिंग्लज तालुक्यातील विविध खेडोपाडी दाखल झाली आहे. हावेरी जिल्ह्यातील विक्रेते विविध वाहनांद्वारे गल्ल्यांमध्ये फिरून मिरची विकताना दिसत आहेत. या दोन्हीही मिरच्या किलोला 140 रुपये दराने विकत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. स्वस्त दरामुळे यंदा जास्त मिरची घेण्याकडे गृहिणींचा कल दिसतो आहे. आता तालुक्यातील गावांच्या यात्रा होत असल्याने मिरच्यांना मागणी वाढली आहे.
पुढील महिन्यापासून मिरच्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलावर्ग दारासमोर आलेल्या कर्नाटकातील या मिरच्या खरेदी करीत आहे. मिरची बाजारात चांगल्या दर्जाच्या कर्नाटकी गरुडा मिरचीचा दर 180 पासून सुरू असून संकेश्वरी 600, स्पायसी जवारी 220च्या पुढे, तर ब्याडगीचा दर 200 रुपयांच्या पुढे आहे, अशी माहिती मिरची व्यापारी पांडुरंग चव्हाण यांनी दिली.
मिरच्यांचा इतिहास
ब्याडगी मिरची कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात ब्याडगी नावाचे गाव आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. या गावच्या नावावरून या मिरचीला ‘ब्याडगी मिरची’ असे नाव पडले आहे. ही मिरची डब्बी व कड्डी (अर्थात भरदार आणि लहान) या दोन प्रकारची असते.
जवारी मिरची : या मिरचीचे उत्पादन कर्नाटकापाठोपाठच गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ, मुत्नाळ, हेब्बाळ, हिटणी, माद्याळ, हनिमनाळ, शेंद्री, मुगळी, नूल, शिंदेवाडी, बसर्गे, हसुरचंपू, खमलेहट्टी या भागातून मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ही संकेश्वरी मिरची म्हणून ओळखली जाते. जवारी मिरचीचे संकेश्वरी, स्पायसी, कर्नाटकी गरुडा आदी प्रकार आहेत. ही मिरची लांबसडक असते. यामध्ये तिखटपणा जास्त असतो. विशेष करून गडहिंग्लज भागातून पिकविल्या जाणाऱ्या संकेश्वरी मिरचीची चव वेगळीच असल्याने मागणी जास्त असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List