…म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला; ऋषिराज सावंत प्रकरणात मोठं ट्विस्ट, महत्त्वाची माहिती समोर
सोमवारी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी देखील तपासाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं नसून ते मित्रांसोबत बँकॉक निघाले होते अशी माहिती समोर आली, याबद्दल खुद्द तानाजी सावंत यांनीच माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?
आपला मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता नाहीये, तो मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता. माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तो बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. मात्र तो नेहमी घरातून बाहेर पडताना सागूंन जातो. मात्र यावेळी तसं काही झालं नाही, म्हणून आम्हाला चिंता वाटली, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे.
या प्रकरणात सिहंगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंत यांच्या बँकॉक जाण्याला त्यांचे वडील तानाजी सावंत आणि पत्नी यांचा विरोध होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून बँकॉकला निघालेले विमान हवेतून फिरवून पुन्हा थेट पुण्यात आणले गेले. ऋषिराज यांनी बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 लाख रुपये मोजले होते. हवेतील विमान पुन्हा माघारी बोलवण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं होतं त्यासाठी सिहंगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती या प्रकरणात समोर आली आहे. ऋषिराज सावंत यांच्यासह त्यांचे मित्र संदीप वसेकर आणि प्रवीण उपाध्ये हे बँकॉकला निघाले होते.
दरम्यान या प्रकरणात सोमवारी रात्री पोलिसांकडून ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी माहिती देताना त्यांनी म्हटलं की, मी व्यावसायिक कारणासाठी बँकॉककला निघालो होते, माझं अपहरण झालं नसल्याचं ऋषिराज यांनी म्हटलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List