अजित पवारांना सोबत घ्यावे, एकनाथ शिंदेंना दूर करावे, देवेंद्र फडणवीस यांची रणनीती…अंजली दमानियांचे भाकीत काय?
राज्यातील राजकारणात येत्या दोन महिन्यांत मोठे बदल होणार आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जवळीक वाढत आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना बाजूला केले जात आहे. भाजपने त्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या ज्या योजना होत्या त्या आता बंद केल्या जात आहेत. अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे राजकीय विश्लेषण समाजसेविका अंजली दमानिया यांनी केले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना त्यांनी विविध विषयांवर मते मांडली.
पोलिसांकडूनच आरोपींना मदत?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलताना अंजिल दमानिया म्हणाल्या, मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेले आहेत. तीन महिने जुने हे सीसीटीव्ही फुटेज दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी गाडीतून उतरून पळून जात आहेत. पुढे पोलिसांचा फौजफाटा आहे. नाकाबंदी आहे. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी टीप तर दिली नाही ना? असा संशय निर्माण होत असल्याचे दमानिया यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार
संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात मी अनेक पुरावे दिले आहेत. आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करुन त्यांचा राजीनामा होतील, अशी मला अपेक्षा आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
धनंजय देशमुख यांचाही आरोप
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, आतापर्यंत जो घटनाक्रम आहे, जे सीसीटीव्ही आले आहे त्यावर आम्ही अगोदर बोललो आहे. हे सगळे आरोपी वाशीच्या हद्दीतून गाडी सोडून पळाले आहेत. पोलीस त्यांच्या मागे होते. पोलिसांना आरोपी कोणत्या जंगलातून पळून गेले ते माहीत हवे होते. जंगलातून निघण्यासाठी 2-3 मार्ग आहेत, त्या मार्गांवर पोलिसांना रेकी ठेवायला हवी होती, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
भावाचा खून झाला, त्याचे कोणतेही गांभीर्य पोलिसांना नव्हते. सीआयडीकडे तपास येईपर्यंत हे प्रकरण पोलिसांकडून सहज घेतले जात होते. आम्ही वारंवार सांगत होतो, ऍक्शन घ्या, कॉल रेकॉर्डिंग काढा, सीडीआर काढा, पण दखल घेतली जात नव्हती. पोलिसांना आरोपीचे कॉल का येत होते? त्याची चौकशी करावी, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List