पंकजा मुंडे यांचं वेगळ्या पक्षाच्या वक्तव्यावर अखेर स्पष्टीकरण, म्हणाल्या मी वेडी…
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी काल एक वक्तव्य केलं होतं. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील असं त्यांनी म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं, त्यानंतर आता त्यांनी आपल्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी काय दुसरा पक्ष स्थापन करायला वेडी आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मी म्हटले की मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील. पक्ष उभाच आहेना भाजप. मुंडे साहेबांनी सुरुवातीपासून पक्षासाठी काम केलं, आणि तो उभा केला आहे. मुंडे साहेबांवर लोक प्रचंड प्रेम करतात. अशा अर्थाने मी ते वाक्य बोलले. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांनी घातला. त्याच पक्षात त्यांनी शेवटचा विसावा घेतला. लगेच एका चॅनलने चालवलं, पकंजाताई म्हणाल्या पक्ष स्थापन करणार. आता मी काय वेडी आहे का? वेगळा पक्ष स्थापन करायला. अरे मी वेगळा पक्ष कसा स्थापन करेल? दिल्लीत मोदी आहेत, इथे फडणवीस आहेत. खाली वर दोन्हीकडे आमची सत्ता आहे. मी मंत्री आहे. मग मी असं कशामुळे करेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी रागवले म्हणून आज फटाके फुटले नाहीत. जेव्हा तुम्ही माझ्यावर जेसीबीनं फुलं वाहतात तेव्हा मला प्रत्येक पाकळी एक एक टनाची वाटते. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून तुम्ही सर्व जण माझ्यावर खूप प्रेम करत आहात. तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आणि माऊल्या आहात. मी प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देणार आहे. आता मी मंत्रिमंडळात आहे, प्रत्येक जिल्ह्याचा विकास करायचा आहे. मला आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल, कारण परळी तिकडे राष्ट्रवादीला गेला हा मतदारसंघ आता भाजपकडे आहे, असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List