“प्रेम झालं नव्हतं, ते लादलं गेलं..”; सर्वांसमोर विकीचं हे बोलणं ऐकून संतापली अंकिता
कलर्स टीव्हीवरील ‘लाफ्टर शेफ्स’चा दुसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या शोमध्ये स्वयंपाकासोबतच सेलिब्रिटींची थट्टामस्करीही बरीच पहायला मिळतेय. टेलिव्हिजन सेलिब्रिटी यात स्पर्धक म्हणून सहभागी झाले असून परीक्षकांना प्रभावित करण्यासाठी ते वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवतात. कॉमेडियन भारत सिंह या शोचं सूत्रसंचालन करतेय. या शोच्या नव्या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन प्रेमाबद्दल असं काही बोलतो, जे ऐकून तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होतात. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
कलर्स टीव्हीने ‘लाफ्टर शेफ्स’चा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रोमोमध्ये शोचे सर्व स्पर्धक एकमेकांसोबत मजामस्करी करताना दिसत आहेत. अशातच भारती सिंह ही प्रेमाशी संबंधित एक प्रश्न विचारते. ती म्हणते, “प्रेम म्हणजे काय?” यावर उत्तर देताना अंकिता लोखंडे म्हणते, “प्रेम ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे. यामध्ये भांडणंसुद्धा होतात.” अंकिताची प्रतिक्रिया ऐकून कॉमेडियन कृष्णा अभिषेक म्हणतो, “तू चुकीचं बोललीस की प्रेमात भांडणं होतात. प्रत्यक्षात प्रेमात फक्त भांडणंच होतात.” हे ऐकल्यानंतर सर्वांनाच हसू अनावर होतं.
प्रेमाबद्दल हीच थट्टा मस्करी सुरू असताना अंकिताचा पती विकी जैन तिच्याकडे पाहत म्हणतो, “मला वाटतं हे प्रेम झालंच नाही, कदाचित ते लादलं गेलंय.” असं बोलून विकी जोरजोरात हसू लागतो. पण अंकिता मात्र त्याच्यावर चांगलीच रागावते. ती किती नाराज होते, हे तिच्या चेहऱ्याकडे पाहून स्पष्ट समजतं. याआधी अंकिता आणि विकीने ‘बिग बॉस’ या शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात अनेकदा या दोघांमध्ये भांडणं झाली. पती विकी आणि सासूकडून अंकिताला ज्याप्रकारे वागणूक दिली जाते, हे पाहून नेटकऱ्यांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा सर्वकाही ठीक असल्याचं पहायला मिळालं.
‘लाफ्टर शेफ्स 2’मध्ये अंकिता आणि विकीशिवाय अभिषेक कुमार, समर्थ जुरैल, रुबिना दिलैक, मन्नारा चोप्रा, दीपिका कक्कर, तेजस्वी प्रकाश, उषा नाडकर्णी हे सेलिब्रिटीसुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List