अब्बावर चाकूहल्ला करणाऱ्याला माफ करण्याची तैमुरची इच्छा; सैफने सांगितलं कारण
अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका बांगलादेशी नागरिकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. 16 जानेवारी 2025 ही घटना घडली होती. या हल्ल्यानंतर आठ वर्षांचा मुलगा तैमुर सैफला घेऊन रुग्णालयात पोहोचला होता. सैफसोबत घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले होते. त्यापैकी दोन वार गंभीर होते. सैफच्या पाठीत चाकूचा तुकडा रुतला होता. इतके गंभीर वार होऊनही सैफने आरोपीविषयी दया व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो हल्ल्याच्या घटनेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचप्रमाणे मुलांची आणि कुटुंबीयांची त्यावर काय प्रतिक्रिया होती, याविषयीही त्याने सांगितलं.
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “तैमुरला वाटतं की चोराला आम्ही माफ केलं पाहिजे. कारण तो भुकेलेला होता, असं त्याला वाटतं. मलाही त्याच्याबद्दल वाईट वाटतं. माझ्यापेक्षा जास्त त्या बिचाऱ्या व्यक्तीचं आयुष्य आता खराब झालंय. पण त्याने माझ्यावर हल्ला करायला पाहिजे नव्हता. आक्रमकतेने वार करून त्याने मर्यादा ओलांडली. माझा छोटा मुलगा जहांगीरने मला एक प्लास्टिकची चाकू दिली आहे. रात्री झोपताना उशीजवळ ठेव, असं तो म्हणाला. पुन्हा कधी घरात चोर शिरला तर मी स्वत:ची त्याने रक्षा करावी, असं त्याला वाटतं. तर पत्नी करीना माझ्या आणि मुलांच्या सुरक्षेविषयी खूप चिंतेत आहे. घटनेनंतर ती प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतेय.”
सैफवरील घटनेनंतर मुंबई आणि विशेषत: वांद्रे परिसर सुरक्षित नसल्याचा आरोप अनेकांकडून झाला होता. याविषयी सैफने आपलं मत मांडलं. “मी समाजाला, पोलिसांना किंवा मुंबईला दोष देणार नाही. मी स्वत: दोषी आहे, कारण मी घराला आतून व्यवस्थित कुलूप लावलं नव्हतं. पण असं काही घडेल याचा स्वप्नातही आम्ही विचार केला नव्हता. पूर्वी माझ्याकडे सुरक्षेसाठी बंदुक असायची, पण आता मी तीसुद्धा जवळ ठेवत नाही. कारण घरात लहान मुलं आहेत आणि त्यांच्या हाती लागलं तर याहून वाईट काहीतरी होण्याची शक्यता असते. मला स्वत:भोवतीही बॉडीगार्ड घेऊन फिरायला आवडत नाही. त्याची गरज नाही असं मला वाटतं.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List