नतमस्तक होऊन…मी पुन्हा..; बाबासाहेबांबद्दलच्या ‘त्या’ विधानावरुन राहुल सोलापूरकरांचा माफीचा दुसरा व्हिडिओ
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे एकामागोमाग एक वाद होत असून त्यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राहुल सोलापूरकरांना महाराष्ट्राचा रोष सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली.
तो वाद शांत होत नाही तोच आता त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेले विधान समोर आले आहे. यावरुन पुन्हा वाद निर्माण झाला. याबद्दल आता त्यांचा दुसऱ्या माफीचा व्हिडीओही समोर आला आहे.
राहुल सोलापूरकरांचा माफीचा दुसरा व्हिडिओ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राहुल सोलापूरकर यांच्यावर पुन्हा एखदा सामान्यांपासून ते नेते मंडळींपर्यंत, तसेच अनेक संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या पायांवर नाक घासून माफी मागावी अशी मागणीही केली जात आहे. मात्र यातच आता सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ही माफी मागितली आहे. नेमकं ते या व्हिडीओमध्ये काय म्हणालेत ते पाहुयात.
“माझ्या पॉडकास्टमधील 2 वाक्य काढून टाकली….”
सोलापूरकर म्हणाले की, “मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर. पुन्हा सर्व बांधवाशी संपर्क करतोय. 2 स्पष्टीकरण द्यायची आहेत. माझ्या पॉडकास्टमधील 2 वाक्य काढून प्रचंड गदारोळ माजला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्राहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना एक शब्द चुकीने गेला होता. मी त्याबद्दल माफी मागितली. माझा तो शब्द हा विषय नव्हता. तर मला महाराजांच्या राजनीतीविषयी बोलायचं होतं. महाराजांनी कशी सुटका करुन घेतली हे मला सांगायचं होतं. पण लाच हा शब्द मी चुकून वापरला, ज्याबद्दल मी जाहीर माफी मागितली”
“कोण कुठल्या घरात जन्माला आला यावर त्याची जात ठरत नाही”
स्वत:ची बाजू मांडताना ते पुढे म्हणाले, “आज पुन्हा एकदा एक विषय पुढे आलाय. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी विधान केलंय असा. छत्रपती राजर्षी शाहु महाराजांची भूमिका करताना त्यात एका प्रसंगात एक विषय होता, कोण कुठल्या घरात जन्माला आला यावर त्याची जात ठरत नाही. तर तो काय करतो यावर त्याची जात ठरते.”
“लोकांची मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय”
सोलापूरकर यांनी पुढे म्हटलं, “श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्याने ते क्षत्रिय ठरतात. या न्यायाने बाबासाहेब आंबेडकर अभ्यासाने इतके विद्वान होते की त्या अर्थाने ते ब्राम्हण ठरतात. चातुरवर्णाचं वितरण आहे. यातील 2 वाक्य काढून काही लोकांची मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. 40 वर्षे या क्षेत्रात वावरत असताना अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतोय. त्यांना नतमस्तक होऊन मी भाषण देतो. या सर्वांचा आदर्श घेऊनच पुढे जातो. तरीही हे का केलं जातंय, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. त्यांच्याविषयी काही अपमानजनक वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. जर कोणाला तसं वाटत असेल तर मी आताही पुन्हा एकदा जाहीर माफी मागतोय. राहुल सोलापूरकर हा प्रामाणिक भारतीय आहे. माझ्याकडून कुठल्याही महाव्यक्तीला कलुषित करण्याचा प्रयत्न स्वप्नातही होणार नाही. मी पुन्हा माफी मागतोय.”
असं म्हणत सोलापूरकरांनी पुन्हा एकदा सर्वांची व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली आहे. आणि स्वत:ची बाजूही मांडली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List