रुग्णालयांत होणारी कंत्राटी भरती थांबवा! चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये बाह्ययंत्रणेद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीला विरोध करत मुंबई जिल्हा चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण करण्यात आले. मुंबईमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली मुंबईतील जे. जे., सेंट जॉर्ज, कामा व आल्ब्लेस, जी. टी. रुग्णालय, नागरी स्वास्थ्य पेंद्र (वांद्रे), पोद्दार आयुर्वेद रुग्णालय, दंत महाविद्यालय व रुग्णालय येथील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटना, मुंबई जिल्हा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. परंतु आयुक्तांकडून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्हा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईमधील सर्व महाविद्यालये व रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे, अशी माहिती मुंबई जिल्हा संघटनेचे सरचिटणीस पराग आडिवरेकर यांनी दिली. दरम्यान, आमदार मनोज जामसुतकर यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेत शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे त्यांना आश्वासन दिले.
अशा आहेत मागण्या
मे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेमार्फत सफाई कामगारांची पदे भरण्याचे खासगीकरण बंद करावे, जेवढ्या रिक्त पदांवर बदली कर्मचारी काम करीत आहेत तेवढी रिक्त पदे वगळून उर्वरित रिक्त पदांची भरती सरळसेवेने करावी, जे. जे. रुग्णालयातील पारिचारिकेने मारहाण केलेल्या कर्मचाऱ्याला न्याय मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेल्या दोन दिवसीय आंदोलनाचे कपात केलेले वेतन परत अदा करावे अशा मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List