MAHARERA : घराच्या स्वप्नाला सुरक्षेचे कोंदण; महारेराचे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल, मार्गदर्शक सूचना केल्या जारी
स्वप्नाच्या आशियानासाठी अनेक जण जीवतोड मेहनत करतात. आयुष्यभराची कमाई गुंतवणूक करतात. अशा ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर बळ देण्यासाठी महारेराने मोठे पाऊल टाकलं आहे. घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांना कायदाचे संरक्षण देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहे. ग्राहकांसाठी महारेराने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. घर खरेदीपूर्वी तुम्ही या सूचना तंतोतंत पाळल्यास तुमची फसवणूक तर टळेलच, पण आयुष्यभराच्या जमापुंजीचे पण चीज होईल.
काय घ्याल काळजी?
कोणत्याही गृहप्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी जुजबी माहिती घेऊ नका. तुमच्या हक्काचे घर कायद्याच्या चौकटीत बसते की नाही हे अगोदर तपासा. संबंधित प्रकल्पावर न्यायालयीन खटला सुरू आहे का? त्याचा तपशील घ्या. एखादा कर्जाचा बोजा प्रकल्पावर आहे का? ती माहिती घ्या. भागीदारांमध्ये वाद तर सुरू नाही ना? हे तपासा. इतकेच नाही तर फ्लॅट खरेदीपूर्वी, घर खरेदीपूर्वी महारेराने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, त्याची खातरजमा हा प्रकल्प, विकासक करतो की नाही ते डोळ्यात तेल घालून तपासा. अधिक माहितीसाठी तुम्ही maharera.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेटू देऊ शकता.
या गोष्टी अगोदर तपासा
नवीन घराची नोंदणी करताना महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करा. तुम्ही निवडलेल्या प्रकल्पात या गोष्टींची पूर्तता आहे की नाही, याची खातरजमा करा.
1. संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून दिला जाणारा मंजुरीचा आराखडा ( Approval plan)
2. प्रारंभ प्रमाणपत्र (CC)
3. भूखंडाचा टायटल क्लिअरन्स रिपोर्ट
4.संबंधित प्रकल्पावर न्यायालयात खटले सुरू आहेत का ? ( Litigation)
5. संबंधित प्रकल्पावर ‘बोजा’ (Encumbrance) आहे का ?
6. पार्किंग व सेवा सुविधांच्या ( Facilities and Amenities) निर्धारित तपशीलासह महारेरा प्रमाणीकृत घर विक्रीकरार ,घर नोंदणीपत्र आहे ना ?
सुरक्षित घर खरेदी /घर नोंदणीसाठी हेही आवश्यकच
1. महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख आवश्यक
2. महारेराने ठरवून दिलेल्या “आदर्श घर खरेदी करारानुसारच” करार
3. एकूण रकमेच्या 10 टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घर नोंदणी /घर खरेदी करत असाल तर विकासकाला घरविक्री करार करणे बंधनकारक आहे
4. महारेराकडे नोंदणीकृत मध्यस्था मार्फतच जागेचा व्यवहार करा
महारेरा नोंदणीकृत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
1. आर्थिक शिस्त : घर खरेदी/ घर नोंदणीपोटी आलेल्या पैशांपैकी 70 टक्के बांधकामासाठीच वापरणे बंधनकारक
2. पारदर्शकता : प्रकल्पाची सविस्तर माहिती महारेरा संकेतस्थळावर
3. प्रकल्पाचा प्रगती अहवाल दर तीन महिन्याला महारेराच्या संकेतस्थळावर नोंदवणे विकासकाला बंधनकारक
4. प्रकल्पासंबंधी तक्रार असल्यास महारेराकडे दाद मागण्याची सोय
5. महारेराच्या संकेतस्थळामार्फत घरबसल्या प्रकल्पाचे संनियंत्रण( Monitoring)शक्य
6. सर्व व्यवहारांसाठी महारेराने ठरवून दिलेल्या चटई क्षेत्राचाच आधार
सजगपणे गुंतवणूक करा
घर खरेदी सुरक्षित व संरक्षित राहावी म्हणून घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. प्रस्तावित प्रकल्पाची कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक छाननी काटेकोरपणे करण्यात येत आहे. प्रकल्प ज्या भूखंडावर उभा राहणार आहे त्याची मालकी, मालकी हक्काबद्दलचे असल्यास वाद. कज्जेदलालीचे तपशील. स्थानिक नियोजन प्राधिकरणाच्या मंजुऱ्या, एकूण किती मजल्याची परवानगी आहे हे दाखवणारे प्रारंभ प्रमाणपत्र. प्रकल्पाबाबतची अशी कायदेविषयक, आर्थिक आणि तांत्रिक समग्र माहिती नोंदणी क्रमांकासाठी सादर करावी लागते. घर खरेदी करार, घर नोंदणीपत्र, पार्किंग आणि सेवा सुविधांच्या आश्वासित तपशीलासह देणेही बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे ग्राहकांनी सजगपणे गुंतवणूक करण्याचे आवाहन महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List