‘मधाचे गाव’ संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ
लाल किल्ला परिसरात भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार असून या महोत्सवास महाराष्ट्र राज्याचा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.
दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ानिमित्त केले जाते. या वर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह बारा राज्यांतील चित्ररथही येथे असणार आहेत. 26 ते 29 जानेवारीदरम्यान भारतपर्व महोत्सव चालेल. हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात असून या वर्षी चित्ररथांसाठी ‘सुवर्ण भारत ः वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याने ‘मधाचे गाव’ असा चित्ररथ तयार केला. मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली.
असा असेल चित्ररथ
चित्ररथाच्या पुढच्या भागात फुलांनी सजवलेली मधमाशीचे आकर्षक शिल्प बसवले आहे. या मधमाशीभोवती लहान मधमाशा आणि काही फुले दाखवली आहेत. भव्य मधमाशीच्या पंखांची हालचाल दाखवण्यात आली असून लहान मधमाशा हवेत उडताना दिसतील. चित्ररथाच्या मागील भागात एक विशाल मधमाशांचे पोळे चित्रित करण्यात आले आहे. नैसर्गिकरीत्या असणाऱया मधमाशांच्या पोळय़ाची अचूक प्रतिकृती बनविली आहे. मधमाशा त्यांच्याभोवती फिरताना दिसतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List