संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? अखेर पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, तर एक फरार आहे. वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरात आक्रेश मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला तरी पंकजा मुंडे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली नाही, यावरून सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. अखेर आपण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही, याबाबत स्वत: मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या विनंतीवरूनच मी मस्साजोगमध्ये गेले नाही. त्यांनीच मला विनंती केली ताई तुम्ही इथे येऊ नये, इथलं वातावरण बरोबर नाही. आता त्यांची परवानगी घेऊनच मी तिथे जाणार आहे, असं मी आधीच जाहीर केलं आहे. माझ्या जाण्यापेक्षा न्याय तीथे आधी गेला पाहिजे, त्यांना भेटणं संतोष देशमुख यांच्या मृत्यूबद्दल संवेदना व्यक्त करणं हा माझा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे, त्याचं प्रदर्शन मांडणं योग्य नाही, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पकंजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, व्यक्त होता येत नाही. मात्र पंकजा ताई जे बोलत आहेत, त्याबद्दल त्यांचं आणि वहिणींचं बोलणं झालं होतं असा खुलासा धनंजय देशमुख यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List