‘…अशी वेळ कुठल्याच सरकारवर आली नाही’, एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा; ठाकरे गटाचा नेता थेट बोलला
पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, मात्र त्यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. ते पुन्हा एकदा आपल्या मुळगावी दरे इथे गेले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. दुसरीकेड पालकमंत्रिपदावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नाराजीनाट्य सुरू झाल्याचं समोर येत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी महायुती सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले सचिन अहिर?
राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी की अर्थकरणासाठी यांना पालकमंत्रिपद कशासाठी हव आहे असा सवाल अहिर यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, असं दिसत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागला. अधिवेशनाच्या एक दिवस आधी खातेवाटप झालं. पालकमंत्री पद मिळाले नाही, म्हणून स्थगिती देण्याची वेळ कुठल्याच सरकारवर आली नाही. या सर्व प्रकरणामधून सरकारमध्ये नेमकं काय चाललंय? असा प्रश्न पडतोय, असं अहिर यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्री पदासाठी एवढी चुरस का आहे? रस्त्यावर उतरू, राजीनामा देऊ, बघून घेऊ अशी यांची भाषा आहे. मंत्री पदापेक्षा पालकमंत्री पदामुळे काय अडलं आहे. हा संशोधनाचा भाग आहे. राजकीय वर्चस्व निर्माण करायचं आहे, की अर्थकारण करण्यासाठी यांना पालकमंत्री पद हवंय? आमच्या सरकारच्या काळात पालकमंत्री पदासाठी नाराजी झाली नाही. सत्तेसाठी हे सुरू आहे, असा टोला अहिर यांनी लगावला आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, यावर देखील अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. काही नसताना त्यांना उमेदवारी दिली. उमेदवारी दिली तेव्हा सर्व नेते चांगले होते. एकनाथ पवार संकुचित विचार करणारे आहेत. त्यांनी संयम ठेवायला हवा होता. त्यांनी टीका करू नय, असं अहिर यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List