गुरुवारी रात्री सैफ अली खानच्या घरी नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिली A टू Z माहिती
Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. विजय दास असे या आरोपीचे नाव आहे. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी बांग्लादेशातील असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही कारवाई केली आहे. यानंतर आता त्याला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता याबद्दल मुंबई पोलिसांनी एक पत्रक काढलं आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने चाकू हल्ला केला. याप्रकरणी सैफ अली खानच्या घरी काम करणाऱ्या एलियामा फिलीप (५६) यांनी तक्रार केली होती. एलियामा फिलीप या स्टाफ नर्स म्हणून सैफ अली खानच्या घरी काम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ०२:०० वाजताच्या सुमारास सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा लहान मुलगा जहाँगीर (४) आणि आया जुनू (३०) यांच्यासह बेडरुममध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी एका अनोळखी इसमाने जबरी चोरी करण्याच्या इराद्याने हातात लाकडासारखी सदृश्य वस्तु आणि हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारासह अनधिकृतरित्या घरातील रूममध्ये प्रवेश केला. यानंतर त्याने माझ्याकडे पैशाची मागणी केली.
यानंतर त्याने हातातल्या हत्यारांसह माझ्यावर, तसेच आया जुनू हिच्यावर आणि तेथे मदतीसाठी आलेल्या सैफ अली खान यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याबद्दल एलियामा यांनी तक्रार दाखल करत सविस्तर जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवला. याप्रकरणी गु.र.क्र ८५/२०२५ कलम ३११, ३१२, ३३१(४), ३३१(४), ३३१(६), ३३१(७) भा. न्या. स अन्वये गुन्हा दाखल केला.
मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक
यानंतर नमूद गुन्हयाच्या तपासाकरीता विविध तपास पथके तयार करण्यात आली. गुन्हयाचा तांत्रिक तपास करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्यात आला. आरोपी हा त्याचे मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास हिरानंदाणी इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिक चौकशी केली असता तो मूळचा बांग्लादेशातील झलोकाठी या ठिकाणी असलेल्या राजाबरीया थाना नॉलसिटी मधील रहिवाशी असल्याचे समोर आले. त्याने हा गुन्हा चोरी करण्याचे उद्देशाने केल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने नमुद गुन्हयाच्या कलमात कलम ३ (ए), ६ (ए) भारतात प्रवेशास प्रतिबंध अधिनियम १९४८ सह कलम ३ (१), १४ परकीय नागरीक आदेश १९४६ अन्वये वाढ करण्यात आलेली आहे.
शरीफुल इस्लाम शहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर वय ३० वर्षे असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. सदरचा संवेदनशील गुन्हा मुंबई पोलिसांच्या विविध पथकांनी अथक प्रयत्न करुन अहोरात्र मेहनत घेवून उघडकीस आणलेला आहे, असे पोलिसांनी पत्रकात म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List