गुजरातचा मोठा डाव, महाराष्ट्रानं उधळला, अनेक दिवसांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदूरबारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या निमित्तानं गुजरात राज्यातील वन विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. गुजरात राज्यातून जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्राचा हद्दीत सोडण्याचा डाव फसला आहे. गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बर्जद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्याचा प्रयत्न होता. मात्र आदिवासी बांधवांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला आहे. विरोध वाढल्यामुळे अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
गुजरातच्या हद्दीतून पकडण्यात आलेले बिबटे महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडण्याचा प्रयत्न सुरू होता. हे बिबटे नर्मदा नदीतून बर्जद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्यात येणार होते. मात्र नर्मदा काठावरील मनिबेली, चीमलखेडी गावातील आदिवासी बांधवांच्या तीव्र विरोधानंतर गुजरातमधील वन अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. नर्मदा काठावर गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप येथील स्थानिक लोकांकडून करण्यात आला आहे. गुजरातमध्ये काम करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बिबट्यांचा धुमाकूळ
दरम्यान महाराष्ट्रात देखील बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष: विदर्भात अनेक ठिकाणी बिबट्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. बिबट्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचं प्रमाणत देखील वाढलं आहे. बिबट्यांची संख्या वाढल्यानं त्यांच्या आधिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष पाहायला मिळत आहे. अनेकदा बिबट्यानं पाळीव प्राण्यावर रात्रीच्या सुमारास अचानक हल्ला करून त्यांना उचलून नेल्याचा घटना देखील कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
ज्या भागांमध्ये ऊसाची शेती आहे, अशा ठिकाणी बिबट्यांचा वावर अधिक असल्याचा पाहायला मिळतं. एकटं दुकटं माणूस दिसल्यास पाळीव प्राण्यांसोबतच बिबट्या माणसांवर देखील हल्ला करतो. आधीच राज्यात बिबट्यांची संख्या वाढली असताना आता गुजरातच्या हद्दीमध्ये पकडण्यात आलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List