सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी कुठे-कुठे गेला? सर्व CCTV फुटेज समोर, पाहा Inside स्टोरी
Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर ६ वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली. यानंतर तातडीने सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या पोलिसांकडून या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. मात्र तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तसेच गेले दोन दिवस पोलिसांकडून विविध संशयितांची तपासणी केली जात आहे. पण खरा हल्लेखोर पोलिसांना चकवा देत असल्याचे दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात फिरत असल्याचे दिसून आले आहे. हा आरोपी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत फिरत आहे. त्यातच आता नुकतंच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे फुटेज दादर परिसरातील स्टेशन परिसरातील दुकानाबाहेरचे आहे. या सीसीटीव्हीमध्ये तो एका दुकानाबाहेरुन चालत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
हेडफोन खरेदीसाठी दुकानात
यानंतर तो एका दुकानात शिरला. तिथे त्याने हेडफोन खरेदी केले. तो साधारण सकाळी ९ वाजता त्या दुकानात आला होता, असे सर्व या सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास एक माणूस हेडफोन खरेदी करण्यासाठी आला. त्याने मला ५० रुपयाचे हेडफोन हवेत असे सांगितले. ते खरेदी करण्यासाठी त्याने मला १०० रुपयांची नोट दिली. त्याने हेडफोन घेतले आणि मी त्यानंतर त्याला ५० रुपये परत केले, अशी माहिती दिली.
मुंबई पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह
दरम्यान दादर परिसरातील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. आतापर्यंत विविध ठिकाणांहून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेष म्हणजे तो वारंवार कपडे बदलत असल्याने त्याला ओळखण्यात अडचणी येत आहेत. तसेच या आरोपीवर क्राईम वेब सिरीज किंवा चित्रपटाचा प्रभाव त्याच्यावर असावा, अशी शंकाही पोलिसांनी उपस्थित केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List